मुंबई : गेल्या आठवड्यात नोटाबंदीनंतर देशभरात बँकांसमोरील रांगांमध्ये जवळपास ७० हून अधिक जणांचा जीव गेला आहे. या घटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.
नोटाबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी घणाघाती टीका केली आहे.
नोटाबंदीमुळे होणार्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आयपीसी ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. सरकारनं नोटाबंदीमुळे पहिला बळी गेल्यानंतर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज होती. आरबीआयनं तात्काळ बँकांना चलन पुरवठा केला पाहिजे होता, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आजमितीस देशातील लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर त्यांच्याकडे दैनंदिन गरजेसाठी लागणार्या वस्तू खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. बँकेत ५ लाख कोटी जमा करूनही लोकांना २५ टक्के रक्कमही काढता येत नाही आहे. त्यामुळे लोक त्रासले आहेत, असेही निरुपम म्हणाले.