पोलीस आयुक्तांच्या भेटीत मनसेची मागणी
नवी मुंबई : खारघर येथील “पूर्वा” प्ले-स्कूल मध्ये १० महिन्यांच्या चिमुरडीला झालेल्या मारहाण प्रकरणी मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव रवींद्र वालावलकर व रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची भेट घेतली. सदर मारहाण प्रकरणी प्ले-स्कूल चालक मालक व आया यांच्यावर कठोर कारवाई करावी व तात्काळ हे प्ले-स्कूल बंद करण्यात यावे. या गंभीर प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे या व इतर अनेक मागण्या मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या. या निवेदनावर सकारात्मक विचार करू व नवी मुंबई शहरातील सर्वच पाळणा घरे, प्ले-स्कूल्स व नर्सरी यांना कलम १४४ अंतर्गत नोटीसा पाठवू तसेच या सर्व प्ले-स्कूल्सची अधिकृतता तपासणार असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले.
याप्रसंगी वरील मागण्यांबरोबरच प्ले-स्कूलचे मालक व आया यांनी चिमुरडीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच याप्रसंगी हा प्रकार होत असताना निद्रिस्त अवस्थेत असलेल्या अन्य मुलांना सुद्धा गुंगीचे औषध अथवा अमली पदार्थ देण्यात आले होते का याची सखोल चौकशी करण्यात यावी, नवी मुंबईतील सर्व प्ले-स्कूल तसेच खाजगी शाळांमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या मारहाणीचे प्रकार वाढत असून संबंधित ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात यावेत, काम करणाऱ्या आया व शिक्षकांची गुणवत्ता तपासावी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना केली आहे त्याची पाहणी करावी, या सर्व पाळणा घरांवर देखरेखीसाठी स्थानिक महिला मंडळांची समिती नेमण्यात यावी, नवी मुंबई शहरातील प्ले-स्कूल व सर्व खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने आण करत असलेल्या स्कूल बस मध्ये सी.सी.टीव्ही/ जी.पी.एस. यंत्रणा लावण्याचे निर्देश देण्यात यावेत या मागण्याही मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांसमोर मांडल्या. तसेच आयुक्तांबारोबारच्या चर्चेत या प्ले-स्कूल मध्ये काम करणारी आया ही बांगलादेशी असल्याचा संशय ही व्यक्त केला असून याची सखोल तपासणी करण्याची मागणी मनसेने पोलीस आयुक्तांकडे केली.
पोलीस आयुक्तांच्या भेटी अगोदर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव रवींद्र वालावलकर व रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील यांच्या बरोबर मनसे पदाधिकाऱ्यांनी वाशी फोर्टिस रुग्णालय येथे पिडीत मुलीची व तिच्या आई वडिलांची भेट घेऊन मनसे आपल्या सोबत आहे व या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेल असा शब्द देऊन त्यांना आश्वस्त केले.
पोलीस आयुक्तांच्या भेटी वेळी या शिष्टमंडळात नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव रवींद्र वालावलकर, रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, अॅड.अक्षय काशीद, महिला सेनेच्या डॉ.आरती धुमाळ, विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, रोजगार विभागाचे नितीन चव्हाण, आप्पासाहेब कोठुळे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.