महात्मा गांधींजींनी एकेकाळी सांगितले होते की, खेड्याकडे चला. त्यावेळी शहरी भागाच्या आकर्षणाला न भुलता ग्रामीण भागात जावून काळ्या आईची सेवा करून ग्रामीण भागाचे अर्थकारण बदला, असा अर्थ महात्मा गांधींजींना अभिप्रेत होता. पण ७० वर्षापूर्वी गांधींजींनी सांगितलेले आता शहरी भागातील लोकांच्या पचनी पडू लागले आहे. शहरी भागातील लोक मोठ्या संख्येने ग्रामीण भागाकडे आकर्षित होवू लागले आहे. याचा अर्थ त्यांना शेती करायची आहे असा कृप्पा करून कोणी घेवू नका. ग्रामीण भागातील बदलते अर्थकारण हे त्यामागील मुख्य कारण होवू लागले आहे. ज्या ठिकाणी एकेकाळी गहू, बाजरी, भुईमुग.द्राक्षे, उस व्हायचा. त्या ठिकाणी आता इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. ज्या रस्त्यावरून जाताना आंब्याची, चिंचाची, कवठाची झाडे दिसायची, तीच झाडे आता इतिहास जमा होवून त्याच ठिकाणी आता बिल्डरांनी बांधलेल्या इमारतींच्या नामफलकाचे दर्शन होवू लागले आहे. पूर्वी सधन शेतकरी, र्निधन शेतकरी, बागायती शेतकरी, कोरडवाहू शेतकरी असा शेतीनुसार भेदभाव होत असे. पण आता तोही भेदभाव संपुष्ठात आला असून सर्वच शेतकरी एकाच तराजूमध्ये तोलले जावू लागले आहेत. आता सर्वाच्याच शेतीला गुंठ्यांमागे काही लाखांचे भाव येवून एकरी करोडो रूपये भाव येवू लागल्याने गुंठामंत्री ही नवीन उपाधी आता जन्माला येवू लागली आहे. हा फरक आता महाराष्ट्राच्या कोणा एका जिल्ह्यात अथवा तालुक्यात पहावयास मिळत नसून सर्रासपणे अधिकांशपणे पहावयास मिळत असल्याने महाराष्ट्राचा ग्रामीण भाग बदलत असल्याचे पहावयास मिळते.
पूर्वीचा ग्रामीण भाग आणि आताचा ग्रामीण भाग यामध्ये जमिन आसमानचा नव्हे तर एक अविश्वसनीय बदल झाला आहे. मामाचा वाडा चिरेबंदी असे बोबडे बोल आम्ही बडबडगीतातून म्हणायचो. पण आता मामाचा चिरेबंदी वाडाही इतिहासजमा झाला असून त्याजागी स्लॅपच्या इमारती उभ्या राहील्या आहेत. प्रगती होणे आवश्यक आहे. प्रगती आणि विकासाच्या बळावर सुधारणा होवून शेतीही प्रगत झाली असती तर ते महाराष्ट्राच्या पथ्यावरच पडले असते. पण वाढत्या शहरीकरणाने ग्रामीण भागातही अतिक्रमण केल्यामुळे होत्याचे नव्हते होवून बसले आहे. पूर्वी ग्रामीण भागातील महिलांना घर आणि शेतीतून फारसा वेळ मिळत नसे. घरी गाई-म्हशी, बैल-शेळ्या आदी जनावरे असल्यामुळे घरातील माणसे अडकून पडायची. कोणाही जवळच्या माणसाच्या घरातील लग्नकार्य अथवा इतर महत्वाचे कोणतेही कार्य असले तरी या जनावरांकरता घरामध्ये एक-दोन माणसांना थांबून राहावेच लागे. घरी टिव्ही असला तरी घरातील महिलांना मोजकेच कार्यक्रम पहावयास मिळत आहे. सकाळ-संध्याकाळ घरी स्वंयपाक करणार्या महिलांना इतर वेळी शेतामध्ये खुरपताना अथवा इतर शेतीची कामे करताना पहावयास मिळत असायच्या. पण आता कधीही वेळी-अवेळी ग्रामीण भागात घरी गेल्यावर घराघरावर डीश टिव्ही बसलेले दिसून येतात. घरातील गृहीणीच्या हातात खुरपी-विळी याऐवजी आता टीव्ही रिमोट कंट्रोल दिसू लागला आहे. गाई-म्हशी या दुभत्या जनावरांचे दुध काढण्यासाठी ठराविक माणसांचेच हात लागायचे. अन्य माणसांना या गाया-म्हशी आपल्या सडांना हातही लावू देत नसत. इतरांनी दूध काढायचा प्रयत्न करत सडांना हात लावल्यास ती दुभती जनावरे आपल्या लाथांनी समोरच्याला जखमी करत असत. पण आता तोही प्रकार दुर्मिळ झाला आहे. गाई-म्हशींचे दुध काढण्यासाठी विविध उपकरणे बाजारात आली आहेत. गाई-म्हशींचे मागील पाय बांधून व समोरचे तोंड विशिष्ठ साच्यात अडकवून सडांना ते उपकरण लावायचे की दूध आपोआप किटलीत जमा होते. नंतर ते उपकरण काढून ठेवायचे. या फावल्या वेळात शेतकरी अथवा त्याची बायको आता मोबाईल गाणी ऐकताना अथवा व्हॉट्सअपव वर चॅटिंग करताना पहावयास मिळत आहे. पूर्वी-गाई-म्हशींचे दूध काढण्यात एक मज्जा असायची. आपली आजी-आजोबा, मामा-मामी दूध कसे काढतात हे पाहण्यासाठी नातवंडे अथवा भाचेमंडळी लांबवर बसून हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी करायची. दूध काढण्यासाठी आलेली व्यक्ती सुरूवातीला जनावरांशी बोलायची, सडांना पाणी लावून सडांना पातळ केले जायचे. दूध काढताना जनावराने मान हलविली अथवा पाय हलवले की कधी प्रेमाने तर कधी शेलक्या भाषेत जनावरांना दमदाटीही केली जायची. पण आता हे सर्वच इतिहासजमा झाले असून हे चित्र आजच्या तसेच पुढच्या कोणत्याही पिढीला पहावयास मिळणार नाही.
अवेळी पडणार्या पावसामुळे, लहरी हवामानामुळे शेती करणे हा आजच्या काळात एक जुगार होवून बसला आहे. शहरामध्ये काम करणार्या माणसांना काम करताना एक निश्चित माहीती असते की आपण महिनाभर काम केल्यावर ठराविक रक्कम आपल्या हातात पडणार आहे. शेतीवर अवलंबून असणार्या शेतकर्यांचे व त्यांच्या परिवाराचे मात्र तसे नसते. एका पिकामध्ये चांगली कमाई झाल्यावर पुढच्या चार-पाच पिकांमध्ये तोच शेतकरी मातीत गेलेला पहावयास मिळतो. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागात उद्योगधंदे जावून पोहोचले आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कंपनी-कारखान्यासाठी अत्यल्प किंमतीत उपलब्ध होणारी पाहिजे तेवढी जागा, स्वस्तात उपलब्ध होणारा कष्टाळू वर्ग, शुध्द हवामान यामुळे उद्योजक व कारखाणदारांनी उद्योगधंद्याकरता ग्रामीण भागावर गेल्या दशकभरामध्ये लक्ष केंद्रीत केल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे शेतातील जमिनीला पूर्वी कवडीमोल असणारा दर आता अचानक गगनाला जावून भिडला आहे. एकेकाळी काही लाखामध्ये एकरी मिळणार्या शेतजमिनीचा एकरी दर करोडो रूपयांमध्ये जावून पोहोचला असून केवळ एक गुंठाच आता तीन ते दहा लाख रूपयांपर्यत जावून पोहोचला आहे.
सुरूवातीला आयुष्यभर शहरी भागामध्ये काम करायचे आणि सेवानिवृत्त झाल्यावर गावी जावून भावाकडे वडीलोपार्जित जमिनीची वाटणी करून गावी राहायचे, असा क्रमही या शहरीकरणामुळे बदली झाला आहे. वडीलांच्या हयातीत वाटण्या होवू लागल्या अहोत. चुकून वडीलांच्या हयातीत वाटण्या झाल्या नाही तर वडीलांचा मृत्यू झाल्यावर अवघ्या महिन्याभरातच वाटण्यांकरीता भांडणे होवू लागली आहेत. वडीलांचे साडेपाच महिन्याचा कार्यक्रम होईपर्यतही वाट पाहण्यास कोणी तयार नाही. शेतामध्ये आयुष्यभर काम करूनही जितकी कमाई मिळत नाही, त्यापेक्षा कैकपटीने कमाई शेती विकून मिळत असल्याने शेतजमिन विकणार्या ग्रामीण भागातील शेतकर्यांचा कल वाढीस लागला आहे. शेतातील मळ्यामध्ये घर बांधून शेतीवर लक्ष देणारा शेतकरी आता तालुक्यातील विकसित भागामध्ये फ्लॅटमध्ये आपल्या बायका-मुलांसह राहू लागला आहे. उद्या आपल्या मुलांना शेती नसणार याचे भानही या शेतकर्यांना राहीलेले नाही.घरापुरती गावामध्ये जमिन ठेवून शहरी भागात स्थायिक होण्याकडे शेतकर्यांची युवा पिढी भर देवू लागली आहे.
एकेकाळी अंगणवाडी शेतकर्यांची मुले जायची. अंगणवाडीमध्ये शेतकर्यांच्या मुलांना खाण्यासाठी पौष्ठिक आहार म्हणून सुकड दिली जायची. मुले ती सुकड खात नसायचे. पण घरातील शेळीला, कोंबडीला, कुत्र्यांना सुकड चांगली म्हणून मुले तीच सुकड घरी घेवून यायची. सुकड जास्त डब्यात बसावी म्हणून शेतकर्याची बायको मुलांना डब्याकरता मोठा डब्बा द्यायची. पण आता हेही चित्र इतिहासजमा होवू लागले आहे. अंगणवाड्याच नाही तर गावातील मराठी शाळांनाही आता टाळे लागण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यात मोठ्या संख्येने इंग्रजी माध्यमांच्या तसेच कॉन्व्हेंटच्या शाळा झाल्या आहे. शेतकर्यांच्या दारासमोर त्या त्या शाळांच्या बसेस मुलांना घेवून जाण्यासाठी-परत आणण्यासाठी उभ्या राहू लागल्या आहेत.
प्रगती ही कधीही समाज हितावह असावी. ग्रामीण भागात होत असलेली प्रगती ही शेतीच्या मुळावर उठली आहे. नजीकच्या भविष्यात शेतकर्यासह, शेतीच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. गुंठामंत्री ही आज अभिमानाने शेतकर्यांची युवा पिढी उपाधी मिरवित असली तरी भविष्यात आजचे गुंठामंत्री उद्य ा आपण शेतीहीन होणार आहोत, याचेही भान ठेवत नाही. मामाच्या गावची आंब्याची झाडे, बोरी इतकेच नाही तर बाभळीही आता नाहीशा होवू लागल्या आहेत. ज्या रस्त्यावरून फक्त एसटीचा धुराळा उडायचा, त्याच रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या संख्येने फिरू लागली आहे. गावागावात बिअरबार उघडू लागले असल्याने वरातीकरीता दारू आणण्यासाठी शेजारच्या गावातही जाण्याची आज तसदी घ्यावी लागत नाही. गावातील जत्रा, यात्रा, तमाशे याचीही क्रेझ कमी होवू लागली आहे. एकेकाळी हक्काने वर्षातून एकदा धान्य घेवून जाणारा बहूरूपीदेखील आता टिंगलटवाळीचा विषय बनू लागला आहे. एकेकाळी अभिमानाने ‘गड्या आपुला गाव बरा ’ असे म्हणणारा शहरी माणूस आता गावी जाण्याबाबत विचार करू लागला आहे. गावामध्ये व शहरामध्ये फारसा फरक राहीलेला नाही.