नवी मुंबई : शहराच्या विकासात सर्वांचा सहभाग अपेक्षित असून ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी साधल्या जाणा-या प्रत्यक्ष संवादातून त्यांच्या तक्रारी, अडचणी समजून घेता येतात त्याचप्रमाणे त्यांच्या महापालिकेकडून असलेल्या अपेक्षा व शहर विकासाबाबतच्या त्यांच्या संकल्पना सूचना जाणून घेता येतात अशा शब्दात 700 ते 800 मोठया संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान, सेक्टर 8, नेरुळ येथे ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाप्रसंगी सुसंवाद साधला. यावेळी मनोगत व्यक्त करताना महानगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी नागरी सेवा सुविधा पुरविण्याचे काम करीत आहेत, त्यामध्ये नागरिकांनीही शहराबाबतचे आपले दायित्व ओळखून सक्रीय योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी नागरिकांनी अतिक्रमण,रस्ते पदपथावरील फेरीवाले, उदयानातील दिवाबत्ती, सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविणे, एन एम टी बस सेवा सुरु करणे, विरगुंळा केंद्र, मोबाईल टॉवर, बेकायदा पार्कीग व, भटके श्वान अशा विविध विषयांवर आपली लेखी निवेदने सादर केली व तोंडी सूचना केल्या. प्रत्येक नागरिकांचे म्हणणे नीट ऐकून घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तात्काळ करता येणाऱ्या कामासंबधीच्या निवेदनाबाबत 7 ते 15 दिवसात कार्यवाही करण्याचे संबधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले व धोरणात्मक बाबींवर सकारात्मक विचार करण्यात येईल असे स्पष्ट केले.
वॉक विथ कमिशनर उपक्रमात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती नागरिकांना देण्यात येते आज पर्यत झालेल्या एकूण 21 “वॉक विथ कमिशनर” उपक्रमात 1402 निवेदने प्राप्त झाली असून त्यापैकी 1191 निवेदनांवर कार्यवाही करण्यात आली व उर्वरीत 211 निवदनांवरील कार्यवाही प्रगती पथावर आहे अशी माहिती त्यांनी दिली.
नागरिकांना महापालिकेकडे तक्रार / सूचना करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागू नये यादृष्टीने www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System) अत्याधुनिक करण्यात आली असून या या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. असे सांगत त्यांनी त्या तक्रारीवरील कार्यवाहीची सद्यस्थिती नागरिक जाणून घेऊ शकतात व तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर समाधान झाले नाही तर पुन्हा तक्रार दाखल करू शकतात अशी माहिती दिली.
याप्रसंगी “वॉक विथ कमिशनर” या उपक्रमाचे नागरिकांशी थेट संवाद साधणारा हा उपक्रम शहर विकासाला चांगली गती देणारा असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. आजच्या निवेदनकर्त्यांमध्ये युवक, युवतींची मोठ्या संख्यने उपस्थितीही लक्षवेधी होती.
नागरिकांनी यावेळी ज्या ज्या समस्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासमोर मांडल्या, त्या समस्या निवारणासाठी गत सभागृहात रतन मांडवे यांनी व आताच्या सभागृहात स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पाठपुरावा केला आहे. सीसीटीव्ही, रस्त्यावर अवडजड वाहनांचे पार्किग, एनएमएमटीची बससेवा, विरगुंळा केंद्र, नागरी आरोग्य यासह अन्य सुविधांकरता मांडवे दांपत्य गेल्या साडे सहा वर्षापासून महापालिका सभागृहात पाठपुरावा करत आहेत. मागील आयुक्तांनी प्रभागात भेट द्यावी याकरता पाठपुरावा करूनही प्रशासन व आयुक्त दाद देत नसल्याचे पाहून नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी सभागृहात खाली बसण्यास सुरूवात करण्याचा इशारा देताच आयुक्तांनी या प्रभाग ८७ ला भेट दिली होती. आताचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही आपल्या प्रभागातील उद्यानात ‘वॉक विथ कमिशनर’ हे अभियान राबवावे यासाठी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी तीन वेळा लेखी निवेदने पालिका आयुक्तांना सादर केली होती.
सुविधांकरता पाठपुरावा करत आहोत, प्रभागातील समस्या पालिका प्रशासनासमोर मांडत आहोत, पालिका आयुक्तांनी या ठिकाणी भेट दिल्यास जनतेला त्यांच्या समस्या आयुक्तांसमोर मांडता येतील याच हेतूने आपण आयुक्तांना ‘वॉक विथ कमिशनर’ या ठिकाणी राबविण्याकरता पाठपुरावा केला असल्याची माहिती नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी यावेळी दिली.
स्थानिक नागरिकांनी यावेळी ज्या ज्या समस्या मांडल्या, त्या त्या समस्या निवारणासाठी व सुविधा मिळवून देण्यासाठी मागील सभागृहात रतन मांडवेसाहेबांनी व आताच्या सभागृहात मी पाठपुरावा करत असल्याचेही यावेळी नगरसेविका मांडवे यांनी यावेळी सांगितले.