- पुणे, – ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारीच होते. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत निमाली. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी कळविले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता, मुली स्वाती व कीर्ती तसेच मुलगा आशुतोष जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामीण साहित्याच्या प्रवाहात दर्जेदार भर घालणाºया यादव यांनी या साहित्यप्रकाराचा सखोल अभ्यास केला होता.
- झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल अशा चार खंडातील आत्मचरित्रांमधून त्यांनी आपला जीवनसंघर्ष उलगडला होता. त्याचबरोबर गोतावळा, भय, स्पर्शकमळे, भूमीकन्या, मायलेकरं, एकलकोंडा, मळ्याची माती अशी बरीच साहित्यनिर्मिती त्यांनी केली. काही वर्षांपूर्वी नटरंग या त्यांच्या कादंबरीवर त्याच नावाचा चित्रपट प्रदर्शित होऊन तो गाजला. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले.
30 नोव्हेंबर 1935 रोजी त्यांचा कोल्हापुरात जन्म झाला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर आणि पुणे येथून शिक्षण पूर्ण केले. आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी 1990 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. घरभिंती, नांगरणी, काचवेल कादंब-याही प्रसिद्धीच्या झोतात आल्या. आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या संतसूर्य तुकाराम या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना 2009 सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले होते. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून मागे घ्यावी लागली होती. लेखनातूनही निवृत्ती घेण्याचा इरादा त्यांनी 29 एप्रिल 2013 रोजी बोलून दाखविला होता. आनंद यादव यांनी सुमारे 40हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
आनंद यादव यांची साहित्य संपदा
काव्यसंग्रहहिरवे जग (१९६०)मळ्याची माती (१९७८)मायलेकरं (दीर्घ कविता)(१९८१)कथासंग्रहखळाळ (१९६७)घरजावई (१९७४)माळावरची मैना (१९७६)आदिताल (१९८०)डवरणी (पुस्तक) (१९८२)उखडलेली झाडे (१९८६)व्यक्तिचित्रेमातीखालची माती (१९६५)ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथस्पर्शकमळे (१९७८)पाणभवरे (१९८२)१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाहआत्मचरित्र मीमांसामराठी लघुनिबंधाचा इतिहासग्रामीणता : साहित्य आणि वास्तवग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्यामराठी साहित्य : समाज आणि संस्कृतीकादंबरीगोतावळा (१९७१)नटरंग (पुस्तक) (१९८०). पुढे यावर नटरंग हा मराठी चित्रपट निघाला.एकलकोंडा (१९८०)माऊली (१९८५)संतसूर्य तुकारामआत्मचरित्रात्मकझोंबी (१९८७)घरभिंती (१९९२)काचवेलबालकथाउगवती मने