नवी मुंबईः सहामाही परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आईकडून त्याबाबत विचारणा झाल्याने अकरावीत शिकणार्या एका विद्यार्थीनीने रागाच्या भरात गाढी नदीच्या पुलावरुन उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना पनवेल भागात घडली. निर्मला हणमंत यादगिरी (16) असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती पनवेलच्या पोदी नं.2 भागात आईसह राहण्यास होती. तसेच ती बांठिया हास्कुलमध्ये अकरावीमध्ये शिकत होती. नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेमध्ये निर्मलाला कमी गुण मिळाले होते. त्यामुळ 26 नोव्हेंबर रोजी रात्री आईने तिला त्याबाबत विचारणा करुन यापुढे आणखी चांगला अभ्यास
करुन चांगले गुण मिळविण्याचा सल्ला दिला. मात्र, आईकडून मिळालेल्या या सल्ल्यामुळे दु:खी झालेल्या निर्मलाने रात्री सव्वा आठच्या सुमारास गाढी नदीचे पुल गाठून त्याच्यावरुन उडी टाकत आत्महत्या केली. सदर
प्रकार त्याठिकाणावरुन जाणार्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने उघडकीस आला.
दरम्यान, निर्मलाची बहिण शेजारील विचुंबे गावात राहण्यास असून निर्मला रागावून तिच्याकडे गेली असावी असे समजुन निर्मलाची आई तिला शोधण्यासाठी विचुंबे येथे जात होती. मात्र, गाढी नदीच्या पुलावर लोकांची गर्दी पाहुन निर्मलाची आई तेथे पाहणी करण्यास गेली असता, त्याठिकाणी निर्मलाचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन निर्मलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बालवडकर यांनी दिली.