सुजित शिंदे
* सल्लागार निवडीसाठी साडेचार कोटी मोजणार
* मुंबईकरांचा 440 एमएलडी साठा वाढणार
* उद्या स्थायी समितीत होणार निर्णय
* वाढत्या पाण्याची तहान भागविण्यासाठी घेतला निर्णय
मुंबई : मुंबईकरांच्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने गारगाई धरण प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार या प्रकल्पाचा अहवाल तयार केला जाणार आहे त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून, त्यासाठी महापालिका सुमारे साडेचार कोटी रुपये मोजणार आहे. 30 नोव्हेंबरच्या स्थायी समितीच्या पटलावर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. गारगाई धरण प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर 440 दशलक्षलिटर पाणी वाढ होणार आहे.
मुंबईच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार भविष्यातील पाण्याची मागणी वाढणार असल्याने मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ या दोन धरणांचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगाडे गावात गारगाई प्रकल्प सुरू आहे. नियोजित धरणातून जलबोगद्याद्वारे पाणी मोडकसागर धरणात आणले जाणार आहे. केंद्रीय जल आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार जल उत्पत्ती, पुरस्थिती, धरणक्षेत्राचे सर्वेक्षण, स्थलाकृती सर्वेक्षण, भुतांत्रिकी, भौगोलिक भूशास्त्रीय बांधकाम आणि मातीची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी महापालिकेने मे. वॅपकॉस लिमिटेड सल्लागाराची निवड केली आहे. त्यासाठी या सल्लागाराला महापालिका 4 कोटी 63 लाख 68 हजार रुपये मोजणार आहे.