सखापाटील जुन्नरकर
पालिका सभागृहात मंजुरी : भाजपने केला विरोध
बेस्ट तोट्यात असताना सभागृहात ठरावाला मंजुरी
निवडणूकीच्या तोंडावर मोफत प्रवासाचा प्रस्ताव
मुंबई – बेस्ट बसमधून आमदार खासदारांना मोफत प्रवास दिला जातो त्याच धर्तीवर महापालिकेतील माजी नगरसेवकांना मोफत प्रवास देण्याच्या ठरावाला मंगळवारी पालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाने प्रस्तावाला पाठींबा दिला. नगरसेवक पदाचा कालावधी संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असतानाच निवडणुकीच्या तोंडावर मोफत प्रवासाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक मेहराजउद्दीन शेख यांनी माजी नगरसेवकांना बेस्ट मधूनप्रवास मिळावा अशी ठरावाची सुचना मांडली हेाती. नगरसेवक पदाचा कालावधी संपल्यानंतरही विभागातील नागरिक सतत त्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे नगरसेवक नसतानाही त्यांना नागरिकांच्या कामानिमित्त महापालिकेचे मुख्यालय, रुग्णालये तसेच खात्यांच्या कार्यालयात जावे लागते. यासाठी त्यांना बेस्ट उपक्रमांच्या बेस्ट गाड्यातून प्रवास करताना स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात. उत्पन्नाचे स्त्रोत नसल्यामुळे माजी नगरसेवकांना असा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे त्यांना मोफत प्रवास मिळावा अशी सुचना शेख यांनी ठरावाद्वारे केली होती. ही सूचना मंगळवारी सभागृहात चर्चेला आली. या सूचनेला भाजप वगळता इतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी पाठींबा दिला. आमदार- खासदारांचे मानधन वाढते. त्यांना बेस्टमधून मोफत प्रवास दिला जातो. मग माजी नगरसेवकांना का नको. त्यांनाही बेस्टमधून मोफत प्रवास द्यायला हवा असे सांगत सपाचे याकूब मेनन यांनी ठरावाच्या सूचनेला पाठींबा दिला. भाजपचे दिलीप पटेल यांनी मात्र विरोध केला. ते म्हणाले आमदार, खासदारांना बेस्टमधून मोफत प्रवास मिळतो हे खरे असले तरी त्याचे पैसे राज्य सरकारकडून दिले जाते. बेस्ट आर्थिक तोट्यात असताना ही सवलत दिल्यास ते पैसे देणे बेस्ट प्रशासनाला शक्य आहे का? असा सवाल करीत हरकतीच्या सूचनेला त्यांनी विरोध केला. भाजपचे मनोज कोटक यांनीही ही मागणी योग्य नसल्याचे सांगितले. मात्र बहुमताच्या जोरावर या ठरावाच्या सूचनेला महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी दिली.