श्रीकांत पिंगळे
* मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत
* पात्र व गुणवंत खेळाडूंना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातून विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व नवी मुंबईतून अधिकाधिक गुणवंत खेळाडू निर्माण होऊन शहराच्या नावलौकिकात लक्षणीय भर पडावी यादृष्टीने क्रीडा प्रशिक्षण केंद्र, स्पोर्टस नर्सरी, क्रीडा स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाशी असलेले आणि शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०१५-२०१६ मध्ये सहभाग घेतलेले तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडू त्याचप्रमाणे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावर सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडू यांना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने क्रीडा शिष्यवृत्ती लागू करण्यात येत आहे.
त्याकरीता पात्र खेळाडूंनी क्रीडा शिष्यवृत्ती करीता विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता दि.३० डिसेंबर २०१६ पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाकडे करावी असे जाहीर आवाहन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात येत असून विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. तरी नवी मुंबईतील पात्र गुणवंत खेळाडूंनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.