श्रीकांत पिंगळे
* उघड्यावर शौचास बसणार्यांचे १६ ते ३० नोव्हेंबर या पंधरवड्यात प्रबोधन
* कंटेनर पध्दतीची ३ शौचालये
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १९ नोव्हेंबर २०१६ या जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून १६ ते ३० नोव्हेंबर या पंधरवड्यात उघड्यावर शौचास जाणार्या नागरिकांचे विविध प्रकारे प्रबोधन करण्यात येत आहे. या अनुषंगाने आवश्यक त्या ठिकाणी शौचालये निर्माण करण्यात येत असून अशाच प्रकारची कंटेनर पध्दतीच्या ३ सामुदायिक शौचालये अडवली-भूतावली भागात उभारण्यात आली आहेत. चिंचेच्या झाडाजवळ २ व तबेल्याजवळ १ अशा ३ सामुदायिक शौचालयांद्वारे ३० सिट्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे ऐरोली विभागात यादवनगर येथे कंटेनर पध्दतीच्या एका सामुदायिक शौचालयामधून १० सिट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या शौचालयांचे उद्घाटनप्रसंगी कौपरखैरणे, अडवली-भूतावली येथे स्थानिक नगरसेवक रमेश डोळे व सहा. आयुक्त कौपरखैरणे अशोक मढवी तसेच ऐरोली यादवनगर येथील उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक रामआशिष यावद व ऐरोली विभागाचे सहा. आयुक्त चंद्रकांत तायडे आणि इतर अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छ, सुंदर व हागणदारी मुक्त नवी मुंबईसाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून उघड्यावर शौचास जाणार्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करून त्यांच्या वर्तणुकीत बदल घडविण्याच्या अनुषंगाने झोपडपट्टी भागात सामुदायिक / सार्वजनिक शौचालयाचा वापर नागरिकांनी करणेकरीता “Community Triggering’ चे आयोजन करण्यात येत आहे. या पंधरवडा कालावधीत सद्यस्थितीतील सर्व शौचालयांचे परिक्षण करणे, नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयांचे उद्घाटन करून ती नागरिकांच्या वापराकरीता खुली करणे, वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्याकरीता नागरिकांना अनुदान वाटप करणे, सामुदायिक / सार्वजनिक शौचालयांच्या भिंतींवर स्वच्छ भारत मिशन ‘असली तरक्की’ अंतर्गत उपलब्ध असलेल्या होर्डिंग व पोस्टर डिझाईन आकर्षक पध्दतीने पेंटींग करून नागरिकांना संदेश देणे अशाप्रकारे विविध उपक्रम स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाच्या उप आयुक्त श्रीम.रिता मेत्रेवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, परिमंडळ १ चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ २ चे उप आयुक्त अंबरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत.