अनंतकुमार गवई
नवी मुंबई : शहराच्या क्रीडा विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असून त्यासोबतच खेळांची मैदाने विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक स्वरूपाचे क्रीडा संकुल असावे याकरीता सुयोग्य भूखंड उपलब्ध होण्यासाठी मागील 6 वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर याकडे विशेष लक्ष देत सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.
दि. 24 नोव्हेंबर 2016 रोजीच्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत महापालिका आयुक्तांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने क्रीडा संकुल प्रयोजनाकरीता आरक्षित असलेला भूखंड क्रमांक 1, सेक्टर 13, घणसोली हा 1,45,452.96 चौ.मी.चा भूखंड नवी मुंबई महानगरपालिकेस स्पोर्टस् कॉम्प्लेक्स ऐवजी विभागीय क्रीडा संकुल विकसित करण्याकरीता भूखंड वाटप करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू निर्माण होण्यास महत्वाची उपलब्धी लाभलेली आहे.
या भूखंडावर महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक साईज तरणतलाव तसेच ट्रॅक अँड फिल्ड, इनडोअर स्टेडियम, हॉकी स्टेडियम, कबड्डी व खो-खो स्टेडियम व सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच आजुबाजूच्या परिसरातील युवक – युवतींना संपूर्ण सुविधायुक्त आंतराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाचा वापर करता येईल. यापुर्वी या भूखंडाच्या अधिमूल्यापोटी इसारा रक्कम (EMD) रू. 1,55,56,195 जप्त न करता भूखंडाच्या नवीन वाटपपत्रातील किंमतीतून सदर रक्कमेचे वजावटीसही सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आलेली आहे.
सदर भूखंडात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधायुक्त विभागीय क्रीडा संकुलाची नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत निर्मिती करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलामध्ये सध्या विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या नव्या नियोजित विभागीय क्रीडा संकुलामुळे अधिक दर्जेदार व विविधांगी क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे सहजशक्य होणार आहे. नवी मुंबई लगत असणा-या मुंबई व ठाणे महानगरपालिका क्षेत्रात देखील अद्ययावत असे क्रीडा संकुल उपलब्ध नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल उभारण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेचा मनोदय आहे.