अनंतकुमार गवई
नवी मुंबई : गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय नजरेसमोर ठेवून प्रयोगशील शिक्षणाचा अंगिकार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याची सर्वांनीच योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात महापालिका क्षेत्रातील शाळा व्यवस्थापनांचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक यांच्याशी आयुक्तांनी सुसंवाद कार्यक्रमात थेट संवाद साधला. याप्रसंगी व्यासपिठावर अतिरिक्त आयुक्त सेवा रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संदीप संगवे उपस्थित होते.
सर्वांच्या शाश्वत भविष्याच्या दृष्टीने विचार करीत जागतिक पातळीवर आता’एज्युकेशन फॉर पिपल अँड प्लॅनेट’ या शैक्षणिक संकल्पनेकडे विशेष लक्ष दिले जात असून आधुनिक स्वरूपातील शैक्षणिक बदलांची नोंद घेत सर्वांनी अद्ययावत राहण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांच्या शारीरिक अपंगत्वाचा विचार केला जातो, मात्र मोठ्या प्रमाणात आढळणा-या अध्ययन अक्षमतेकडे तितकेसे गांभिर्याने पाहिले जात नाही असे सांगत आयुक्तांनी उत्तम शिक्षकाचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे त्याला विद्यार्थ्यामधील अंगभूत क्षमता ओळखता यायला हव्यात असे सांगितले.
मुलांचा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विचार करूनच यापुढील काळात महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्या स्वरूपाचे विविध उपक्रम राबविण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. उत्कृष्ट शाळा साकारण्यासाठी इमारत – मैदाने – स्वच्छता अशा उत्तम सेवासुविधांची उपलब्धता, दर्जेदार शिक्षकवृंद, निर्णयक्षम प्रशासकीय नेतृत्व, सुयोग्य पध्दतीने अंतर्गत व बाह्य मूल्यमापन आणि शिस्त या पाच गोष्टींची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी विविध पूरक उदाहरणे देत उपस्थितांशी थेट सुसंवाद साधत स्पष्ट केले.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या दृष्टीने शाळांनी महानगरपालिकेस द्यावयाची माहिती संपूर्ण व अचूकपणे 15 डिसेंबर 2016 पर्यंत मानवी हस्तक्षेप टाळण्याच्या दृष्टीने ऑनलाईन स्वरूपात द्यावी असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड काढणे गरजेचे असून महानगरपालिकेने त्यासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यामुळे शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड 15 डिसेंबरपर्यंत काढून घेणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविकपर मनोगतात शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे सर्व शाळांचे ध्येय असून ही उद्दिष्टपूर्ती सुगम व्हावी यादृष्टीने विचारविनिमय होण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून हा शाळा व्यवस्थापनांचे प्रमुख व मुख्याध्यापक यांचेसोबत सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी प्रोजेक्टरव्दारे मोठ्या पडद्यावर शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी शिक्षणाचा अधिकार कायदा व शासनाच्या शिक्षण विभागाने काढलेल्या विविध शासन निर्णयांची, परिपत्रकांची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका शाळांसह विविध बोर्डाच्या खाजगी शाळांचे संपूर्ण सहकार्य गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या कामी लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व 15 डिसेंबरपर्यंत शाळांनी सर्व माहिती महापालिकेस द्यावी आणि विद्यार्थ्यांची आधार कार्ड काढून घ्यावीत असे आवाहन केले.