अनंतकुमार गवई
* आमदार संदीप नाईक यांची एमएमआरडीएकडे मागणी
* एमएमआरडीएच्या आयुक्तांसोबत बैठकीत घेतला विकासकामांचा आढावा
नवी मुंबई : झपाटयाने विकसीत होत असलेल्या नवी मुंबईत पायाभूत सुविधांचा विकास होण्यासाठी आमदार संदीप नाईक सातत्याने यशस्वी प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात त्यांनी शुक्रवारी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु.पी.एस. मदान यांची भेट घेतली. रबाळे पोलीस स्टेशन ते ऐरोली दिवा सर्कल मार्गावरील रोज होणारी वाहतुककोंडी फोडण्यासाठी उन्नत मार्ग बांधण्याची मागणी करुन उडडाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामांना गती देण्याची मागणी आमदार नाईक यांनी आयुक्त मदान यांच्याकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मदान यांनी या संबंधीची कार्यवाही तत्परतेने करण्यात येईल, याबददल आमदार नाईक यांना आश्वासित केले.
ऐरोली शहरातून मुंबई आणि नवी मुंबईकडे दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या वाहनांमुळे ऐरोली, रबाळे पोलीस स्टेशन ते ऐरोली दिवा सर्कल पर्यंत प्रचंड वाहतुककोंडी निर्माण होते. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. रोजच्या त्रासाने कंटाळलेले नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या ठिकाणी उन्नत मार्ग बांधावा, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीकडे गांभिर्याने पाहून या उन्नत मार्गासाठी सर्व्हेक्षण करुन त्याच्या बांधकामासाठी निधीची तरतुद करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली असता त्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त मदान यांनी दिली.
ठाणे-बेलापूर मार्गावरील भविष्यातील वाहतुकीचा वाढणारा ताण पहाता आमदार संदीप नाईक यांनी एमएमआरडीएकडून सविता केमिकल जंक्शन येथे उडडाणपूल, घणसोली-तळवली येथे उडडाणपूल आणि महापे येथे भुयारी मार्ग मंजुर करुन घेतला आहे. या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला.
सविता केमिकल येथील उडडाणपूलाचे काम डिसेंबर २०१४मध्ये सुरु झाले होते. या कामाला गती देवून ते लवकरात लवकर पूर्ण करुन येथील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली.
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार्या महापे ते विक्रोळी(कोपरखैरणे) या खाडीपुलासाठी सर्व्हेक्षणाचे काम झाले आहे. मात्र अद्याप काम पुढे सरकले नाही. त्याअनुशंगाने या खाडीपुलासाठी निधीची तरतूद करुन त्याचे काम पुढे न्यावे, अशी मागणी देखील केली.
महापे अडवली-भुतवली येथे उडडाणपूलाचे काम सुरु आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोडची गरज असल्याचे आमदार नाईक यांनी आयुक्त मदान यांच्या निदर्शनास आणून दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणच्या रस्त्याच्या बाजूला बस स्टॉपजवळ पादचारी बोगदा किंवा पादचारी पुल(स्कायवॉक) बांधण्याची आवश्यकता असून तशा प्रकारची मागणी येथील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली. हे काम देखील हाती घेण्याची कार्यवाही करण्याची सुचना केली.
महापे येथील भुयारी मार्ग आणि घणसोली-तळवली येथील उडडाणपूल या दोन कामाची सद्यस्थिती देखील आमदार नाईक यांनी जाणून घेतली. सदरचे काम तत्परतेने हाती घेवून पूर्ण करावे, अशी मागणी केली.
नवी मुंबईची इतर शहरांबरोबरच्या संलग्नतेमुळे रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण पडतो आहे. ठाणे-बेलापूर आणि पामबीच मार्गावर भविष्यात वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे. यावर उपाय म्हणून वाशी ते ऐरोली दरम्यान कोस्टल मार्गाला एमएमआरडीएने अनुकुलता दर्शविली आहे. या कोस्टल मार्गावरोबरच वाशी ते बेलापूर दरम्यान देखील कोस्टल मार्ग बांधावा. त्यासाठीचे सर्व्हेक्षण हाती घेवून कामास सुरुवात करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.
आमदार नाईक यांच्या सुचनांवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्त मदान यांनी बैठकीत स्पष्ट केले.