अनंतकुमार गवई
* नेरूळ पश्चिमेला खुलेआमपणे पुरूषच या रिक्षा चालवितात
* वाहतुक पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण
* रिक्षा संघटनांच्या पदाधिकार्यांची मौनी भूमिका
नवी मुंबई : महिलांकरता सरकारने गुलाबी रंगाच्या रिक्षा सुरू केल्या असून गुलाबी रिक्षांचे चालक महिलांच असल्याने महिला प्रवाशांना प्रवास सुरक्षित करता यावा हा त्यामागील हेतू आहे. तथापि नेरूळ पश्चिमेला महिलांकरीता असलेल्या गुलाबी रिक्षामधून पुरूष चालकच गेल्या काही महिन्यापासून व्यवसाय करत असल्याचे खुलेआमपणे पहावयास मिळत आहे.
नेरूळ सेक्टर 4, 6, सेक्टर 8, सारसोळे बसडेपो, रिक्षा स्थानक तसेच रेल्वे स्टेशन आदी परिसरात गुलाबी रिक्षा पुरूष व्यवसायासाठी चालवित असल्याचे पहावयास मिळते. वाहतुक पोलिसही याप्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचे अन्य रिक्षाचालकांकडून सांगण्यात येत आहे. रिक्षा चालक मालकांच्या समस्यांबाबत आवाज उठविणार्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्यांनादेखील ही बाब माहिती असतानाही त्यांनी मौनी भूमिका घेतलेली आहे. गुलाबी रिक्षा चालविणार्या पुरूष चालकांवर तात्काळ कारवाई करून संबंधित रिक्षाचा दुरूपयोग होत असल्याने जप्त करावी तसेच संबंधित गुलाबी रिक्षांशी संबंधित असणार्या महिला चालकांचे परमिट व परवाना रद्द करावा की जेणेकरून अन्य कोणी या गुलाबी रिक्षांचा व्यवसायासाठी गैरवापर करणार नाही असे अन्य रिक्षाचालकांकडून सांगण्यात येत आहे. वाहतुक पोलिसांची केवळ बघ्याची भूमिका आणि रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्यांची मौनी भूमिका यामुळेच गुलाबी रिक्षातून पुरूष चालक व्यवसाय करण्याचे प्रमाण नेरूळ पश्चिमेला वाढीस लागले आहे. वाहतुक पोलिस कारवाई करत नसल्याने वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे.