अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महानगरपालिका पुरवित असलेल्या नागरी सुविधांचा योग्य वापर करावा, शहर स्वच्छतेसाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन करीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांचा शहर विकासात सहभाग आवश्यक आहे व “वॉक विथ कमिशनर” या उपक्रमातून नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा थेट जाणून घेता येतात असे सांगितले. घणसोली रेल्वेस्टेशन परिसरात नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झालेल्या “वॉक विथ कमिशनर” उपक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
नागरिकांशी चर्चेतून प्रामुख्याने पार्किंग, स्वच्छता, आरोग्य, अतिक्रमण याच विषयांवर प्राप्त झालेली निवेदने लक्षात घेऊन स्वच्छतेच्या दृष्टीने ओला व सुका कचरा घरापासूनच वेगवेगळा करुन कचरा गाड्यांमध्ये देताना वेगवेगळा देण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे कचरा कमी होऊन शून्य कचरा संकल्पना प्रत्यक्षात आणणे शक्य होईल असे ते म्हणाले. सद्यस्थितीत 81 सामुदायिक शौचालये उभारण्यात आली असून नागरिकांच्या मागणीनुसार सर्व्हेक्षण करून आवश्यकतेनुसार अधिक शौचालये उभारण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
शहर स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी जागतिक किर्तीचे गायक – संगीतकार शंकर महादेवन हे महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसेडर असून त्यांच्या माध्यमातून स्वच्छता संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात येत आहे. केंद्र सरकारनेही स्वच्छतेविषयीच्या तक्रारी / सूचना मांडण्यासाठी विकसित केलेले “स्वच्छता-एम.ओ.यू.डी.” हे मोबाईल ॲप नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून स्वच्छतेविषयी आपल्या तक्रारी – सूचना छायाचित्रासह त्यावर पाठवाव्यात, जेणेकरून त्याचे 12 तासात निवारण होईल असे जाहीर केले आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत कोणत्याही नागरिकास केंद्र सरकारमार्फत शहर स्वच्छतेविषयी दूरध्वनी येऊ शकेल. त्यामध्ये खरी माहिती देऊन आपल्या नवी मुंबई शहराचे स्वच्छतेमध्ये मानांकन उंचवावे असे आवाहन आयुक्तांनी केले.
कच-यामध्ये प्लास्टीकचे असलेले सर्वाधिक प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांनी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा असे आवाहन करतानाच 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरूच नयेत असे ते म्हणाले. महानगरपालिका अशा पिशव्या विक्रेत्यांवर सतत धडक कारवाई करीत आहे, त्यात नागरिकांनीही सहकार्य करावे असे त्यांनी सूचित केले.
शहरात मोठ्या प्रमाणावर जाणवणारा पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने वाहतुक पोलीसांसमवेत संपूर्ण नियोजन झाले असून येत्या आठवडाभरात पार्कींग झोन व पार्किंगविषयी मार्गदर्शक फलक लावण्यात येतील असे ते म्हणाले. नागरिकांनी योग्य ठिकाणी पार्किंग करून वाहतुक नियमांचे पालन करावे असेही आवाहन त्यांनी केले. घणसोली रेल्वेस्टेशन समोरील झुडपे वाढलेली जागा स्वच्छ करून पार्किंगसाठी वापरण्याबाबत योग्य कार्यवाही करावी अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर महापालिकेच्या वतीने सतत कारवाई करण्यात येत असते. याबाबत नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित असून भाजी, फळे मार्केटमधूनच विकत घ्यावीत असे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजनेनुसार शेतकरी थेट भाजी घेऊन नागरिक समुहाने एकत्रितपणे मागणी केल्यास नागरिकांपर्यंत पोहचवू शकतात अशी माहिती देत याकरीता इच्छुक असलेल्या सोसायट्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.
नागरिकांना घरबसल्या महापालिकेकडे तक्रार / सूचना करता याव्यात या दृष्टीने www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System) अत्याधुनिक करण्यात आली आहे. या सुविधेव्दारे नागरिक आपण केलेल्या तक्रारीवर सुरू असलेली कार्यवाही जाणून घेऊ शकतात तसेच तक्रारींचे समाधानकारक निराकरण झाले नाही तर पुन्हा तक्रार दाखल करू शकतात. तक्रार निवारणाचा कालावधी निश्चित असल्याने व तक्रारींवर मूल्यमापन करून श्रेणीव्दारे मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना चांगली सोय उपलब्ध झाली आहे, त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असेही ते म्हणाले.
सकाळी 6 वाजल्यापासून नागरिक याठिकाणी मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते. घणसोली नोड हस्तांतरणासाठी सातत्यापूर्ण पाठपुरावा सुरु असून लवकरच नोड हस्तांतरीत होऊन नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरविणे महापालिकेला शक्य होणार असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.