अनंतकुमार गवई
* ध्वनीप्रदूषण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
* नागरिकांकरता पोलिसांचा आधुनिक पर्याय
मुंबई : शहरात होणार्या ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी व्हॉट्स ऍप सेवा सुरु केली आहे. मुंबईच्या पाच प्रादेशिक विभागानुसार देण्यात आलेल्या पाच व्हॉट्स ऍप नंबरवरून नागरीक थेट पोलिसांकडे तक्रार करू शकतात. ही सेवा पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आल्याने वरिष्ठ अधिकार्यांकडून या तक्रारीची दखल घेत, तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
रस्त्यावर विनाकारण हॉर्न वाजविणारे चालक, समारंभ, मिरवणूका, लग्नाच्या वरातीत डीजे, ढोल ताशे आणि स्पिकरचा जोराचा आवाज अशा विविध तक्रारी नागरिकांकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त होत असतात. त्यानुसार कारवाईसुद्धा करण्यात येते. मात्र सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनलेल्या व्हॉट्स ऍपद्वारे ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारी करण्याचा नवा पर्याय पोलिसांनी नागरिकांकरीता उपलब्ध करून दिला आहे. याचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
ध्वनी प्रदुषणाचे ठिकाण, त्याचा फोटो होत असलेला त्रास होत याची माहिती व्हॉट्स-ऍपद्वारे द्वारे मिळताच याची कमांड असलेल्या पोलीस नियंत्रण कक्षातून यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्याने सांगितले. मुंबईकरांनी हे व्हाटस अप नंबर सेव्ह करून या आधारे तक्रारी करत ध्वनी प्रदुषण कमी करण्याच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
………………………….
व्हॉट्स ऍपसेवेसाठी नंबर..
पूर्व प्रादेशिक विभाग – ७०४५७५७२७२,
मध्य प्रादेशिक विभाग – ९८३३३४६१८२,
पश्चिम प्रादेशिक विभाग – ९९८७०९३०६५,
उत्तर प्रादेशिक विभाग – ९३०२१००१००,
दक्षिण प्रादेशिक विभाग – ९८६९९३३५३६