अकोला : नगरपालिका निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा ऐन वेळेवर झाली. तोपर्यंत स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी झाली होती. त्यामुळे सर्वच ठिकाणी युती होऊ शकली नाही. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र राहावे, अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी नव्याने बोलणी करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.
पश्चिम विदर्भात भाजपाने नगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळविले असून, या निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार घेण्यासाठी आयोजित मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दानवे म्हणाले, की भाजपाने निवडणुकीत मिळविलेले यश हे सर्वसमावेशक आहे. नोटाबंदी, मराठा मोर्चा अशा पृष्ठभूमीवर निवडणुकीचे निकाल काय राहतात, याकडे सर्वांचे लक्ष होते; मात्र दलित, मुस्लीम व महिला अशा सर्व वर्गातून भाजपाला मोठा जनाधार मिळाला आहे.
हे भाजपाच्या सरकार व संघटनेसोबतच कार्यकर्त्यांचे यश आहे. भाजपाचे ५५ व भाजपा समर्थित सहा असे ६१ नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. हे यश स्वबळावरच असेल, तरी भाजपाने मित्रपक्षांना सोबत घेण्याचे धोरण सोडलेले नाही. समविचारी पक्षांची महाआघाडी कायम राहावी, अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकांसाठी युतीची चर्चा नव्याने सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. यावेळी नगरविकासमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, भाजपाचे महामंत्री आमदार चैनसुख संचेती, सरचिटणीस रामदास आंबटकर, आमदार डॉ. संजय कुटे व आमदार रणधीर सावकर आदी उपस्थित होते.