नागपूर : उत्कृष्ट संसदपटू, कुशल राजकारणी, अभिनेत्री आणि कठोर प्रशासक असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री श्रीमती जयललिता यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील प्रभावशाली नेतृत्व गमावले, अशी भावना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आज येथे व्यक्त केली.
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या दु:खद निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्तावाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी शोकप्रस्ताव मांडला होता. त्यावेळी ते बोलत होते.
जयललिता यांनी मुख्यमंत्री पदाच्या कालखंडात राज्याच्या हिताचे अनेक लोकप्रिय निर्णय घेतले. सामान्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून अभिनव योजना त्यांनी राबविल्या. या योजनांचे देशपातळीवर स्वागत करण्यात आले. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले आहे, असे श्री. बागडे यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात पोकळी
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या शोकप्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाने देशाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून, देशाच्या राजकारणाचा इतिहास जयललिता यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही. जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडू राज्याची अपरिमित हानी झाली असून जनमानसात प्रतिमा असलेल्या या नेत्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, श्रीमती जयललिता या तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी गरीबांसाठी सुरु केलेल्या ‘अम्मा किचन’चा राज्यातील गरीब लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. त्याचबरोबर प्रसूतीनंतर महिलांना देण्यात येणाऱ्या ‘अम्मा किट’ योजनेमुळे बालकांचे आरोग्य सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्यांच्या या दोन्ही योजना देशभरात गौरविण्यात आल्या होत्या. जयललिता यांच्यातील नेतृत्व गुणामुळे देशातील सरकारवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती म्हणूनही त्यांना गौरविले गेले. त्यांच्या कामाची सचोटी व कर्तव्य दक्षता यामुळे तामिळनाडू राज्याची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. श्रीमती जयललिता यांनी विविध पदव्या प्राप्त केल्या होत्या. त्यांचे अनेक भाषांवरही प्रभुत्व होते. आपल्या कार्यकतृत्वाने देशातील प्रभावी महिला राजकीय नेत्या अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. 1990 ते 2016 या 25 वर्षांचा देशाच्या राजकारणाचा इतिहास श्रीमती जयललिता यांच्या शिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. जनमानसात प्रतिमा असलेल्या अशा या नेत्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पतंगराव कदम, सदस्य सर्वश्री अजित पवार आणि गणपतराव देशमुख यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
विधानपरिषदेत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाबद्दल विधानपरिषद सभागृहातश्रद्धांजली वाहण्यात आली. यासंदर्भातील शोकप्रस्ताव महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीसभागृहात मांडला. या शोकप्रस्तावावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्रीनारायण राणे, शरद रणपिसे, हेमंत टकले, कपिल पाटील, श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भावनाव्यक्त केल्या. त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.