लोकराज्यच्या अधिवेशन विशेषांकाचे होणार प्रकाशन
नागपूर : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 46 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या बुधवारी, दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता विधान भवन परिसरातील विधान परिषद सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत नागपूर हिवाळी अधिवेशनावरील लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
दि.14 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अभ्यासवर्गाचा प्रारंभ दि.7 डिसेंबर रोजी होईल. दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. विधिमंडळाची समिती पध्दती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज या विषयावर विधान परिषदेच्या सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे या मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 9 वा. संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान या विषयावर ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे- पालवे आणि विधानसभा सदस्य प्रणिती शिंदे या मार्गदर्शन करणार आहेत. याच दिवशी सकाळी 10 वा. अर्थसंकल्पाची प्रक्रिया : कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्त्वपूर्ण साधन या विषयावर वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे मार्गदर्शन करणार आहेत.
दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. लोकशाही राज्यातील लोकप्रतिनिधींची विकासात्मक भूमिका या विषयावर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 9 वा. महाराष्ट्राच्या गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अमूल्य स्थान या विषयावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10 वा. प्रगतीशील महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात उद्योग विभागाचे महत्त्व या विषयावर उद्योग मंत्री सुभाष देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत.
10 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. भारतीय संविधानाच्या संदर्भात जगातील राज्यघटनांचे तुलनात्मक विश्लेषण या विषयावर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10 वा. विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसार माध्यमांची भूमिका व जबाबदारी या विषयावर दै. तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11 वा. कायदा निर्मिती व न्यायालयीन सक्रियता या विषयावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अंबादास एच. जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12 वा. सुप्रशासनामध्ये नागरी समाजाची भूमिका या विषयावर मुंबई विद्यापीठच्या विधी प्रबोधिनीचे संचालक व प्राध्यापक डॉ. अशोक यंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.
12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. विधिमंडळाची रचना, कार्यपध्दती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया या विषयावर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव उत्तमसिंह चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10 वा. विधिमंडळ व न्यायालय परस्पर संबंध या विषयावर मुंबई येथील शासकीय विधि महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय नाथानी हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11 वा. विधिमंडळाचे विशेषाधिकार : न्यायालयाची भूमिका व वृत्तपत्राचे स्वातंत्रय या विषयावर मुंबई येथील शासकीय विधि महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. विजय वाघुले हे मार्गदर्शन करणार आहेत.
13 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8.30 वा. संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका या विषयावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 9.30 वा. विविध संसदीय आयुधे व त्यांची परिणामकारक अंमलबजावणी या विषयावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
14 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. विधिमंडळ : जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ या विषयावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 9.30 वा. व्दिसभागृह पध्दतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10.35 वा. रामराजे नाईक-निंबाळकर व हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत अभ्यासवर्गाचा समारोप होणार आहे. यावेळी अभ्यासवर्गात सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशस्तीपत्रांचे वितरण केले जाणार आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाची स्थापना सन 1911 मध्ये एम्पायर पार्लमेंटरी असोसिएशन या नावाने प्रथम इंग्लंडमध्ये झाली. पुढे या मंडळाने 1948 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ असे नाव बदलून त्याप्रमाणे आपल्या घटनेमध्ये दुरुस्ती केली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय लंडन-युनायटेड किंग्डम येथे आहे. संसदीय मंडळ आज राष्ट्रीय, राज्य, प्रांतिक, प्रादेशिक स्वरुपात 175 शाखांमध्ये कार्यरत असून या मंडळाचे जवळ जवळ सतरा हजार पेक्षा जास्त सांसद, विधानमंडळ सभासद आहेत. संयुक्त राष्ट्र संघ व अलिप्त राष्ट्र संघ या खालोखाल राष्ट्रकुल संसदीय संघटना ही एक मोठी जागतिक राष्ट्र संघटना म्हणून ओळखली जाते. या संघाचे सभासदत्व स्वीकारलेल्या राष्ट्रांनी केवळ शासकीय स्तरावरच नव्हे तर अशासकीय स्तरावरील सदस्य राष्ट्रांच्या सामाजिक, राजकीय व अर्थिक जिव्हाळयाच्या समस्यांवर विचारविनियम करुन परस्पर सहकार्य करण्याचे धोरण अंगीकारले आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाची राज्य पातळीवर शाखा स्थापन करुन त्याव्दारे उपयुक्त उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. नागपूर येथे दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशन कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन 1964 पासून दरवर्षी राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय कार्यप्रणाली व प्रथा या विषयांबाबत एक संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेला हा 46 वा संसदीय अभ्यासवर्ग आहे. या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणालीची विद्यार्थ्यांना जवळून ओळख करुन दिली जाते. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचे सह-अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे आहेत.
०००