अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या भेटीगाठी घेवून त्यांच्या समस्या सोडविणे आणि त्यांना सुविधा पुरविण्यासाठी महापालिका प्रशासनाला कार्यरत करणे हा ध्येयाने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे सातत्याने गेल्या काही महिन्यापासून ‘वॉक विथ कमिशनर’ हे अभियान राबवित आहेत. लोकांचाही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने नवी मुंबईकरांनाही महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढेच हवे असल्याचा संदेश नकळत खाडीपलिकडे असलेल्या मंत्रालयीन पातळीवरही जावून पोहोचला आहे.
नागरिकांशी थेट भेट घेऊन त्यांच्या सूचना / संकल्पना / तक्रारी जाणून घेणार्या महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या ’वॉक विथ कमिशनर’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून शनिवारी दि. १० डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ६.३० वा. वीर सावरकर उद्यान, सेक्टर ८, वाशी येथे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महापालिका आयुक्तांशी संवाद साधू इच्छित असणार्या नागरिकांनी आपली लेखी निवेदने सोबत आणून उपक्रमस्थळी सकाळी ६ वाजल्यापासून महापालिकेच्या उपस्थित कर्मचार्याकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार आयुक्तांची भेट घेऊन संवाद साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिकेतील भाजपा वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांचा आयुक्त तुकाराम मुंढेना विरोध असतानाही मुंढे राजकीय विरोधाची पर्वा न करता आपले अभियान उत्स्फूर्तपणे राबवित आहेत. शिवसेना नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप असल्याने अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले असले तरी शिवसेनेच्या अधिकांश नगरसेवकांचा आजही आयुक्त मुंढे यांनाच पाठिंबा असल्याचे पालिका मुख्यालयातील पडद्याआडच्या घडामोडीवरून पहावयास मिळत आहे.