अनंतकुमार गवई
नवी मुंबई : स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आपल्यासमोर ‘सर्वोत्तम गुण’ मिळविणे हेच एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे हे सांगत, त्याकरीता स्पर्धा परीक्षांचे स्वरुप समजून घेणे महत्वाचे आहे हे स्पष्ट करीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे याविषयी मोठ्या संख्यने उपस्थित असलेल्या नवी मुंबईच्या युवक-युवतींना मौलिक मार्गदर्शन केले.
नवी मुंबई : स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आपल्यासमोर ‘सर्वोत्तम गुण’ मिळविणे हेच एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे हे सांगत, त्याकरीता स्पर्धा परीक्षांचे स्वरुप समजून घेणे महत्वाचे आहे हे स्पष्ट करीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे याविषयी मोठ्या संख्यने उपस्थित असलेल्या नवी मुंबईच्या युवक-युवतींना मौलिक मार्गदर्शन केले.
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये त्यांनी उपस्थित तरूणाईशी थेट संवाद साधत स्पर्धा परीक्षांविषयी मौल्यवान टिप्स दिल्या.
‘आपण आज इथे का आलात?’ असा प्रश्न सुरुवातीलाच विचारत त्यांनी तरूणाईच्या उपस्थितीची वेगवेगळी मते जाणून घेतली. यावर ‘आपल्या उपस्थितीचे स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे हेच एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे’ असे सांगत त्यांनी ‘सध्या अभ्यास कसा करता व कसा केला पाहिजे’ या दोन्हींविषयी संवाद साधत स्पर्धा परीक्षेसाठी करावयाच्या योग्य अभ्यास पध्दतीची माहिती दिली.
सर्वोत्तम गुण मिळविण्यासाठीच स्पर्धा परीक्षा देणे हा एकमेव उद्देश आपण नजरेसमोर ठेवायला पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षा या पदास पात्र योग्य उमेदवार निवडण्यासाठी घेतल्या जातात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. याकरीता परीक्षेतील प्रश्नांचे स्वरुप समजून घेणे महत्वाचे असून आयुक्तांनी प्रश्नांच्या विविध स्वरुपांची माहिती दिली. त्यासोबतच उत्तर लिहिण्याच्या पध्दतीची व स्वरुपाचीही विविध उदाहरणे देत व उपस्थितांकडून त्यांची मते जाणून घेत उत्तरांबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली.
स्पर्धा परीक्षा ही ऑलराऊंडर निवडण्याची आहे हे लक्षात घेऊनच अभ्यास करायला हवा असे सांगत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उत्तरातून आपली निर्णय क्षमता दिसून येते हे विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. त्यामुळे परीक्षेत प्रश्न किती मार्कांचा आहे व त्याचे उत्तर आपण कसे देतो यावर आपली स्पर्धा परीक्षेतली गुणवत्ता ठरते असे त्यांनी सांगितले. त्यामुळे परीक्षेकडे प्रक्रिया म्हणून बघा, तसेच प्रश्नपत्रिका वाचू नका तर ती समजून घ्या असा कानमंत्र त्यांनी दिला.
उत्तराचे स्वरुप समजावून सांगताना उत्तराचा गाभा असणारी प्रस्तावना, मुद्देनिहाय माहिती, भिन्न दृष्टीकोन (Different theories), फायदे – तोटे (advantage and disadvantage), दृष्टीकोनाशी संलग्नता (Linkages with theory), अभिप्राय (Opinion)- यामध्ये व्यक्तीगत अभिप्राय अपेक्षित नसून सर्वसमावेशक अभिप्राय, वर्तमान स्थितीशी संलग्नता आणि निष्कर्ष असे सुयोग्य आणि संपूर्ण उत्तराचे 8 विभाग त्यांनी विविध उदाहरणे देत समजवून सांगितले.
प्रश्नाचे स्वरुप समजावून घेऊन प्रश्न – उत्तरांचे लिंक करणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील विषयानुरुप प्रश्नाचे स्वरुप समजून घेऊन अभ्यास करावा असे सांगितले. संपूर्ण आणि अचूक उत्तर हेच यशाचे मर्म असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना केवळ माहिती असणे उपयोगाचे नाही तर असलेल्या माहितीचा वापर कसा आणि कुठे करता याला महत्व असल्याचे स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिकेची 11 ग्रंथालये असून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुलभ व्हावे याकरीता महानगरपालिकेने अभ्यासिका सुरू केल्या असून दिघा, ऐरोली, तुर्भे, नेरुळ, सी.बी.डी. अशा 5 ग्रंथालय अभ्यासिकांमध्ये सकाळी 6 ते रात्री1 अशी अभ्यास करण्यासाठी सर्वांना सोयीची ठरेल अशी वेळ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच त्याठिकाणी स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक पुस्तकेही उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहेत. या सुविधेचा जास्तीत जास्त तरूणांनी उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांकरीता बेलापूर, सेक्टर 20 नेरुळ, सेक्टर 16 वाशी, सेक्टर 10 वाशी, सेक्टर 5 सानपाडा, सेक्टर 5 ऐरोली, सेक्टर 15 वाशी अशा आणखी 7 ठिकाणी अभ्यासिका लवकरच सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोपरखैरणे व घणसोली येथेही अभ्यासिका सुरु करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विकसित केलेले Swachhata-MoUD हे अधिकृत App सर्वांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आपले लोकेशन निवडून डाऊनलोड करून घ्यावे व त्यावर दैनंदिन स्वच्छता विषयक तक्रारी नोंदवाव्यात आणि कार्यवाही नंतर फिडबॅक द्यावा असे त्यांनी सूचित केले. स्वच्छ सर्व्हेक्षण2017 अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून व त्यावर प्रतिसाद देऊन आपल्या नवी मुंबई शहराचे मानांकन उंचावण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने करभरणा व पाणीपट्टी ऑनलाईन भरण्यासाठी तसेच तक्रार निवारण प्रणाली असतील तेथून अगदी चालता-चालता नागरिकांना वापरता यावी यासाठी विकसित केलेले “nmmc e-connet” हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटीबध्द असून हा मार्गदर्शन शिबिराचा उपक्रमही त्याचाच एक भाग असल्याचे सांगत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लवकरच महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक माहिती व उपयोगी साहित्य असणारी “गाई़डन्स” ही लिंक उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर केले.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून स्पर्धा परीक्षांसाठीचे मौलिक मार्गदर्शन व वेगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह तरूणाईच्या गर्दीत बाल्कनीसह ओसंडून वाहत होते.