अनंतकुमार गवई
नवी मुंबई : ज्ञानरचनावाद या जुन्याच संकल्पनेचा बदलत्या काळात नव्याने स्विकार करणे आवश्यक असून पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जात कृतिशील शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे. याकरीताभाषा शिक्षणाच्या माध्यमातून योग्य रितीने संवाद साधणे आणि व्यक्त होणे गरजेचे असून त्यादृष्टीने 10 वीच्या परीक्षेचे स्वरुप बदललेले आहे. हे बदललेले स्वरुप शिक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी नवनीत सारख्या शैक्षणिक प्रकाशन संस्थेने पुढे होत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षकांसाठी घेतलेले आजचे प्रशिक्षण शिबिर निश्चित लाभदायक ठरेल असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महानगरपालिका शाळांच्या इमारती व सुविधा उत्तम दर्जाच्या असून येथील शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी शिक्षकांनी स्व विकास करावा असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने महानगरपालिका आणि खाजगी व्यवस्थापनाच्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी भाषा (उच्च स्तर) मध्ये झालेली पुनर्रचना व त्यामुळे शालांत परीक्षेत बदललेले प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याचा शिक्षकांना परिचय करून देणे तसेच दि. १६ सप्टेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (माध्यमिक स्तर) अनुषंगाने कृतीपात्रिका तयार करण्याबाबतच्या एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मुख्यालय इमारतीमधील ज्ञानकेंद्रात करण्यात आले होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे., शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबईच्या माजी सचिव श्रीम. बसंती रॉय तसेच नवनीत प्रकाशन संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे यांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याला स्व अभिव्यक्त होता आले पाहिजे. प्रत्येक माध्यमिक शिक्षकाला त्याच्या अध्यापनात सुलभीकरण व विषयातील क्षमतांची संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत नवनीत प्रकाशन संस्थेमार्फत गट कार्याच्या माध्यमातून कृतीपत्रिका तयार करण्याबाबतचे मार्गदर्शन देण्यात आले. श्रीम. संपदा जोशी, श्री. प्रमोद महाडिक व श्री सदाशिव पाटील या शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांच्या विचारांचा लाभ या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रात्यक्षिकांसह महानगरपालिका क्षेत्रातील ५२ माध्यमिक शिक्षकांनी घेतला.