अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विरोधातील धडक कारवाई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने तीव्र केली असून नागरिकांना मोकळे पदपथ तसेच रहदारीस उपलब्ध मोकळ्या रस्त्यांमुळे सुलभता लाभली आहे.
या कारवाईच्या अनुषंगाने आज नेरुळ विभाग कार्यालयांतर्गत ब-याच बँका व व्यापा-यांनी मार्जिनल स्पेसमध्ये, समोरच्या फुटपाथवर जनरेटर बसविलेले होते. त्यांना महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. तरीही जनरेटर न हटविणा-या मे. रिलायन्स फ्रेश से. 5, मे. लॉब गार्ड कंपनी से. 4, मे. डॉमिनोज पिझ्झा से. 6 या व्यावसायिकांवर आणि भारतीय स्टेट बँक से. 20, ॲक्सीस बँक से. 6, एच.डी.एफ.सी. बँक से.6, आय.सी.आय.सी.आय. बँक से. 20 या बँकांवर नेरुळ विभाग कार्यालयामार्फत धडक कारवाई करण्यात येऊन 8 ठिकाणांवरील जनरेटर हटविण्यात आलेले आहेत. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून रु. 1.5 लक्ष इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे ऐरोली विभागातही से. 20 येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंड क्र. 74 वर अनधिकृतरीत्या झालेल्या साधारणत: 350 झोपड्या व 1 धार्मिक स्थळ हटविण्यात आलेले आहे. तसेच ठाणे बेलापूर रोड वर ऐरोली येथील अनधिकृत टिंबर मार्केटवर कारवाई करून 15 अनधिकृतरित्या व्यवसाय करणा-या व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे से. 3 ऐरोली येथे अंडरपास जवळील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यात आले. अशाच प्रकारची कारवाई से. 5 सानपाडा येथील अनधिकृतरित्या झालेल्या 60 झोपड्या हटवून करण्यात आली.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली नेरुळ विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. संध्या अंबादे, तुर्भे विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे, ऐरोली विभागाचे सहा. आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे व त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने या अतिक्रमण विरोधी धडक कारवाया करण्यात आल्या असून यापुढील काळात या मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार आहेत.