महाराष्ट्र राज्य कृषि उत्पन्न पणन(विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करून खाजगी बाजार, थेट पणन, शेतकरी-ग्राहक बाजार व कंत्राटी शेती यांची तरतूद करण्यात आली आहे. नुकतेच या अधिनियमामध्ये व्यवहाराचे बाजार समितीचे अधिकार बाजार आवारापुरते मर्यादित केले असून त्यात निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. संपूर्ण जगात शेतकरी बाजार लावण्याची प्रथा अस्तित्वात असून महाराष्ट्रातही शेतकरी बाजाराचे आयोजन करून शेतकर्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा त्यासोबतच ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा अशी संकल्पना राज्यात सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने शेतकर्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा याकरिता शेतकरी आठवडे बाजार राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुरु केले आहे.
*****************************
शेतकरी आठवडे बाजार संकल्पना
शेतकरी तसेच ग्रामिण महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट बाजार पेठ उपलब्ध करून देणे, सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून देणे, शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि उत्पादक सहकारी संस्था यांचा शेतमाल त्यांनी पुरस्कृत केलेल्या गटांमार्फत/ प्रतिनिधींमार्फत विक्री, मध्यस्थ नसल्यामुळे ग्राहक अदा करीत असलेली रक्कम थेट शेतकर्यांस उपलब्ध, मालाची हाताळणी कमी होत असल्याकारणाने सुगीपश्चात नुकसान कमी तसेच मालाचा दर्जा उत्तम राहतो, शेतकरी आठवडे बाजाराची वेळ व ठिकाण निश्चित असल्याकारणाने शेतमाल काढणीचे आणि विक्रीचे नियोजन करणे शेतकर्यांना शक्य, इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत शेतमालाचे वजन. त्यामुळे ग्राहकांमध्ये वजनाबाबत विश्वास निर्माण करणे, बाजार पेठेचा अंदाज येत असल्याने बाजारात आणावयाच्या मालाबाबत नियोजन करणे शक्य, शंभर टक्के रोखीने व्यवहार, कोणत्याही प्रकारच्या परवान्यांची आवश्यकता नाही , ग्रामिण भागातील युवकांना चांगल्या अर्थार्जनाचा रोजगार उपलब्ध, वाजवी भावामध्ये ग्राहकांना भाजीपाला उपलब्ध होत आहे.
******************
शेतकर्यांना आठवडे बाजाराचे फायदे
शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक सहकारी संस्था यांचेमार्फत थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी , कृषि माल शेतातून थेट बाजारात येत असल्याकारणाने काढणी नंतरच्या होणार्या नुकसानीत मोठी घट, रोख स्वरूपात १०० टक्के मालाची रक्कम थेट शेतकर्याच्या हातात, आपल्या मालाचा बाजार भाव ठरविण्याचा शेतकर्याला अधिकार, अत्यंत कमी शेतमाल विक्री खर्च, ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण होते, ग्राहकांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा, थेट विक्रीमुळे मध्यस्थांना मिळणारी रक्कम थेट शेतकर्याला प्राप्त, बाजारात विक्री होणार्या मालाचा अंदाज आल्याने भाजीपाला शिल्लक रहात नाही.
*******************
ग्राहकांना आठवडे बाजाराचे फायदे
ताजा स्वच्छ शेतमाल थेट शेतकर्यांकडून उपलब्ध, शेतकरी विक्री करीत असल्याकारणाने मालाच्या प्रती बाबत खात्री, थेट शेतकर्यांशी संवाद होत असल्याकारणाने ग्राहक आपली गरज शेतकर्याला सांगू शकतात, थेट शेतकर्यांकडून शेतमाल खरेदीचे ग्राहकांना समाधान, घराजवळ भाजीपाला बाजार पेठ उपलब्ध, भाजीपाला खरेदीचे आठवड्याचे नियोजन करता येते , एकाच छताखाली भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, दुध, डाळी, प्रक्रिया उत्पादने, ग्रामिण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध, शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत होत असल्याने ग्राहकांना वजनाबाबत विश्वास आहे.
नवी मुंबई मधील वाशीप्रमाणेच बेलापूरमध्येही आठवडी बाजार आयोजित करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण महापालिका क्षेत्रात आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे.बेलापूर मध्ये दर रविवारी एन.आर.आय. कॉम्प्लेक्स, सी.बी.डी.बेलापूर,दर बुधवारी महानगर गॅस लि. पंपाच्या बाजुला असलेले मैदान, सी.बी.डी. बेलापूर, दर शनिवारी सुनिल गावस्कर मैदान, से.१, सी.बी.डी. बेलापूर येथे असे आठवडे बाजार सुरु झाले असून सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत भरविण्यात येत आहेत.
सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभाग महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने शेतकरी आठवडे बाजार हे अभियान सुरु केले आहे. शेतकरी आठवडे बाजार शासनाच्या या उपक्रमातून ताजा शेतमाल ग्राहकांना उपलब्ध होत आहे. शासनाच्या या स्तुत्य अभियानाचा शेतकरी व ग्राहक हे नक्कीच लाभ घेतील.
——————–
विभागीय माहिती कार्यालय,
कोंकण भवन, नवी मुंबई
(नवी मुंबई लाईव्ह.कॉम या वेबसाईटवर बातम्या प्रकाशित करण्यासाठी आपण आपल्या बातम्या आजच नव्हे तर आताच मेल करा.
– अनंतकुमार गवई , व्यवस्थापक, नवी मुंबई लाईव्ह.कॉम)
मेलआयडी ़:- Navimumbailive.com@gmail.com