नागपूर : विविध आक्रमणे आणि अतिरेकी कारवायापासून सैन्याने रक्षण केले म्हणून आपण विकासाकडे वाटचाल करू शकलो. देशाचा विकास व जनतेमध्ये आलेली समृद्धी ही सैनिकांनी केलेल्या बलिदानामुळे आली आहे. या गोष्टीचे सामाजिक भान ठेवून जनतेने सशस्त्र दल ध्वज दिन निधी संकलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी झाला. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महापौर प्रवीण दटके, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक निमसे आदी यावेळी उपस्थित होते. शासनाच्या कॅशलेस धोरणाला अनुसरून स्वाइप मशीनद्वारे ध्वजदिन निधी संकलनास मुख्यमंत्र्यांनी कार्ड स्वाईपद्वारे निधी देऊन सुरुवात केली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सैनिकांनी विपरीत परिस्थितीत धीराने आणि धैर्याने मुकाबला करुन देशाची मान उंच ठेवली असून तिरंगा खाली येऊ दिला नाही. देशातील सव्वाशे कोटी भारतीयांना सैन्याचा व सैनिकांचा अभिमान आहे. शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या मागे सर्व देश उभा असून शहिदांच्या कुटुंबियांनी एकटे समजू नये, तर या देशाची सव्वाशे कोटी जनता हेच त्यांचे कुटुंब आहे. राज्य शासनाने माजी सैनिक विभागाच्या प्रलंबित बाबी निकाली काढल्या आहेत. सैनिकांनी याचक म्हणून शासनाकडे येऊ नये, अशी आमची भावना असून राज्य शासनच आपले कर्तव्य म्हणून त्यांचे प्रश्न सोडविणार आहेत.
शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये रेखा सूर्यवंशी व विठ्ठल सूर्यवंशी, सुमनबाई चंद्रभान शिंदे व चंद्रभान शिंदे, शीतल संतोष जगदाळे, रंजना विनायक काटे, अंबिका नारायण भोंदे, स्नेहा विकास कुळमेथे व विमल जनार्दन कुळमेथे, निशा चंद्रकांत गलांडे, बेबी जानराव उईके व जानराव उईके, शर्मिला राजेंद्र तुपारे व शांता आणि नारायण तुपारे, भानुदास सोमनाथ ठोक यांचा तसेच मोहिमेत अपंगत्व आलेल्या शिपाई राहुल भीमराव मगरे, शिपाई राजू धोंडीराम साळुंखे, हवालदार रमेश तुकाराम मुंढे, नायक शैलेंद्र पांडुरंग चक्रनारायण, सिग्नलमन विठ्ठल सदाशिव इंगळे, शिपाई विवेक पोपटराव मोरे, हवालदार बाळू पांडुरंग लावंड यांचा ताम्रपट, धनादेश देऊन गौरव करण्यात आला. तसेच यावेळी सैन्य सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या सेवेतील मेजर सचिन सदाशिव पाटील, मेजर आकाश अशोक तापडिया, मेजर रवींद्र शांताराम कोकणे, मेजर जनरल मनोज पांडे या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
ध्वजदिन दिन निधी संकलनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, कॅप्टन दीपक लिमसे यांचाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वसुंधरा सहस्त्रभोजनी आणि गोपाल वानखेडे यांनी ध्वजदिन निधीसाठीचा धनादेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे दिला.