डॉ.संजीव गणेश नाईक यांनी मानले रेल्वे प्रशासनाचे आभार
नवी मुंबई : एमयुटीपी ३ अंतर्गत प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानक आणि ऐरोली-कळवा उन्नत मार्ग हे दोन प्रकल्प आघाडी सरकारच्या काळातीलच असून आता त्यांचे काम सुरु होणार असल्याबददल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार डॉ.संजीव गणेश नाईक यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही प्रकल्प मागील दोन वर्षांच्या कालावधीतच पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही याबददल खंत व्यक्त करुन यापुढे या प्रकल्पांचे काम लवकरात लवकर नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, अशी प्रतिक्रीया डॉ.नाईक यांनी दिली आहे.
नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांना थेट कल्याण आणि कर्जतकडे जाता यावे तसेच कल्याणकडील प्रवाशांना नवी मुंबईत येणे सुकर व्हावे यासाठी ऐरोली- कळवा नवा उन्नत मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर दिघा रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी डॉ. नाईक यांनी केली होती. त्यासाठी रेल्वे बोर्ड, तत्कालीन रेल्वे मंत्री, एमआरव्हीसी आणि एमयुटीपी प्राधिकरणांकडे आपल्या खासदारकीच्या पाच वर्षाच्या कालखंडात अविरत पाठपुरावा केला होता. त्यानंतर एमयुटीपी-३च्या टप्प्यात २०१३सालीच मंजुंरी मिळाल्यानंतर तत्कालिन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिघा रेल्वे स्थानक आणि ऐरोली ते कळवा उन्नत मार्गासाठी रेल्वेच्या अर्थ संकल्पात निधीची तरतुद करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्या अनुशंगाने तांत्रिक बाबी पूर्ण करीत १८ डिसेंबर २०१३मध्ये एमआरव्हीसीचे अध्यक्ष राकेश सक्सेना यांनी डॉ.नाईक यांना लिहिलेल्या पत्रात या कामासाठी २०१४-२०१५च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली होती.
केंद्र सरकार आणि मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून हे दोन प्रकल्प उभे राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना नवी मुंबईतून कल्याणकडे आणि कल्याणच्या दिशेने नवी मुंबईत येणार्या प्रवाशांना ठाणे स्थानकाला वळसा घालण्याचा द्रविडी प्राणायाम वाचणार आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघाच्या खासदारकीच्या पाच वर्षात डॉ.संजीव गणेश नाईक यांनी मतदार संघातील नागरिक आणि प्रवाशांना भेडसाविणार्या अनेक समस्या खासदार आपल्या भेटीला या आपल्या अभिनव उपक्रमांअंतर्गत मार्गी लावल्या आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी रोखण्यासाठी सॅटीस जोड पुलावर एफओबी पुलाची उभारणी करुन गर्दीचा प्रश्न मार्गी लावला आहे. मीरा-भाईंदरमधील रेल्वे प्रवाशांकरीता दोन पादचारी पुलाची निर्मिती अशा अनेक सुविधा निर्माण केल्या.