अनंतकुमार गवई
यावेळी नागरिकांनी विशेषत्वाने पार्कींग, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा, उद्यान या विषयांवर आयुक्तांना निवेदने सादर केली. यामधील त्वरीत करावयाच्या कामांवर 7 ते 15 दिवसांत कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट करीत धोरणात्मक विषयांवर पाहणी करुन योग्य कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात न जाता घरबसल्या आपल्या तक्रारी/सूचना करता याव्यात याकरीता www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ‘तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System)’ कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांनी त्यांच्या सूचना/तक्रारी यावर कराव्यात, जेणेकरुन त्यांना तक्रार क्रमांक प्राप्त होईल व ते आपल्या तक्रारीवर सुरु असलेली कार्यवाही जाणून घेऊ शकतात. तक्रार निवारणाचा कालावधी निश्चित असल्याने नागरिकांच्या तक्रारींचे विहीत कालावधीत निराकरण होणे शक्य होत असून नागरिकांना श्रेणी देऊन कामाचे मु्ल्यांकन करण्याची शिवाय तक्रारींचे निराकरण झाले नाही तर पुन्हा तक्रार दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
आता यापुढे जात महापालिकेने nmmc e-connect हे मोबाईल ॲप विकसित केले असून त्यावरही तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्यामुळे नागरिक असतील तेथून, अगदी चालता-चालता आपल्या स्मार्ट मोबाईलच्या एका टचवर छायाचित्रासह आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय या ॲपव्दारे मालमत्ता कर व पाणीपट्टीही भरणा करता येऊ शकते. हे ॲप आपल्या स्मार्ट फोनवर डाऊनसोड करून या प्रणालीचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करावा व शहर विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्तांनी केले.
तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र सरकारने स्वच्छ सर्व्हेक्षण हाती घेतले असून स्वच्छतेविषयीच्या तक्रारी / सूचना मांडण्यासाठी “swachhata MoUD” हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून स्वच्छतेविषयीच्या आपल्या तक्रारी -सूचना छायाचित्रासह त्यावर पाठवाव्यात, जेणेकरून त्याचे 12 तासात निवारण होईल अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत शहरांच्या स्पर्धेकरीता 2000 गुण असून त्यापैकी 600 गुण नागरिकांच्या अभिप्रायांना व शिफारशींना आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने आपल्या शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
ई-गव्हर्नन्सच्या अनुषंगाने तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System) वर आजपर्यंत 1057 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 967 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे व उर्वरीत प्रक्रियेत आहेत अशी स्वत:च्या मोबाईलवरून लाईव्ह माहिती देत त्यांनी नागरिकांना वापरण्यासाठी ही प्रणाली अत्यंत सोपी व सहज असल्याने तिचा जास्तीत जास्त वापर करावा असे सूचित केले.
यावेळी एका नागरिकाने उत्स्फुर्तपणे महानगरपालिका पुरवित असलेल्या सुविधा योग्य रितीने वापरण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे असे स्पष्ट करत शहर विकासात नागरिकांचेही योगदान तितकेच महत्वाचे आहे असे सांगितले व नागरिकांशी थेट संवाद साधणारा महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांचा ”वॉक विथ कमिशनर” हा उपक्रम म्हणजे शहर विकासाचा दुवा आहे अशा शब्दात या उपक्रमाचे कौतुक केले.