नवी मुंबई शहर आणि पामबीच मार्ग यांचे गेल्या दीड दशकाच्या कालावधीत एक आगळे वेगळे नाते निर्माण झालेले आहे. नवी मुंबईतील वैशिष्ठ्यांचा उल्लेख करावयाचा झाल्यास पामबीच मार्गाचा आर्वजून उल्लेख हा करावाच लागेल. पामबीच मार्गाला राणीच्या गळ्यातील हार, मिनी बॉम्बे-पुणा एक्सप्रेस हायवे, मुंबईचा नरिमन पॉईट अशा विविध नावांनी संबोधला जातो. या मार्गावर फारसे अडथळे नसल्याने वाहन चालक वेगाने वाहन हाकण्याची आपली हौस भागवून घेत असतात. त्यामुळे वेगाच्या आकर्षणापायी वेगावरील नियत्रंण गमावून बसतात आणि अपघात करून मोकळे होतात. पामबीच मार्गावरील वाढत्या अपघातामुळे अल्पावधीतच मृत्यूचा सापळा याही नावाने संबोधला जावू लागला आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील तसेच ठाणे-बेलापुर मार्गावरील वाशी-तुर्भे ते बेलापुरदरम्यानची वाहतुक कोंडी संपुष्ठात आणण्यासाठी सिडको प्रशासनाने २०००च्या सुमारास पामबीच मार्गाची वाशी सेक्टर १७ येथील महात्मा फुले भवन चौकापासून ते सध्याच्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयालगतच्या बेलापुर किल्ला गावठाण चौकापर्यत करण्यात आली. हा मार्ग दोन्ही बाजूने तीन मार्गिकेचा बनविण्यात आला आहे. या मार्गावर मोराज सर्कल चौक, नेरूळ सेक्टर ४ व ६ कडे वळसा मारणारा सारसोळे जेटीजवळील चौक , आगरी कोळी भवनाकडे वळसा मारणारा चौक, करावे गावालगतचा चौक, नेरूळ सेक्टर ४८ मधील चौक, एनआरआर वसाहत, नेरूळ सेक्टर ५० चा चौक या ठिकाणी सिग्नल उपलब्ध असले तरी या चौकामध्ये वाहतुक पोलिस अपवादानेच पहावयास मिळतात. हा मार्ग सिडकोने बनवून त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केला. सुरूवातीच्या काळात या मार्गाच्या विद्युत देयकावरूनही गोंधळ झाला होता. मार्ग हस्तांतरीत केल्यावर सिडकोने वीज बिल भरले नाही व त्यानंतर महापालिकेने जुने बिल भरण्यास नकार दिल्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने पामबीच मार्गावरील पथदीपांचा विद्युत पुरवठाच खंडीत केला होता.
तीन मार्गिकेचा पामबीच मार्ग, जाण्या-येण्यासाठी वेगवेगळे लेन व जा-ये करण्याच्या मध्यभागी डिव्हायडरवर पामबीच वृक्ष, अंत्यत मनमोहक दृश्य. या मार्गावर भरधाव वेगाने वाहने हाकण्याची स्पर्धाच जणू वाहनचालकांमध्ये निर्माण झाली. त्यातूनच अपघाताचा आलेख उंचावत गेला. वाढत्या अपघातामुळे पामबीच मार्गाच्या नावलौकीकालाही अल्पावधीतच काळीमा लागला. पामबीच मार्गावर वाढते अपघात पाहून या मार्गावर २४ तास एक रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे काही सामाजिक घटकांकडून सातत्याने लेखी मागणीही करण्यात आली. तथापि महापालिका प्रशासनाकडून या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. चौकामध्ये सिग्नलजवळ आल्यावर वाहनांची गतीला काही प्रमाणात मर्यादा यावी याकरता पालिका प्रशासनाकडून रंब्लरही बसविण्यात आले. पण या रंब्लरवरूनही वाहने धडाडत गेली, पण वाहनचालकांनी आपल्या वाहनांचा वेग कमी करण्याचे सौजन्य मात्र दाखविले नाही. कालांतराने पामबीच मार्गावरील रंब्लरही नाहीशे झाले. त्यानंतर वळसा मारताना वाहनांना लांबूनच समजावे याकरता पालिका प्रशासनाने फायबरचे कठडे बांधले. काही ठिकाणी अपघातामुळे कठडे तुटले तर उरलेले फायबरचे कठडे काही अज्ञात समाजकंठकांनी कापून नेले. मुळातच या मार्गावर बेलापुर किल्ले गावठाण चौकाचा अपवाद वगळता कोठेही वाहतुक पोलिस पहावयास मिळत नाही. पामबीच मार्गाच्या सुरूवातीला मोराज सर्कलच्या चौकालगतच तसेच सारसोळे जेटीलगतच्या नेरूळ सेक्टर ४ व ६कडे वळसा मारणार्या चौकालगतच वाहतुक पोलिस सकाळी ९ नंतर ते रात्री ९च्या अगोदर वाहतुक पोलिस असतात. पण ते पामबीच मार्गावर थांबण्याऐवजी मार्गापासून हाकेच्या अंतरावर उभे असतात. सिग्नल तोडून वळसा घालून आलेली वाहने पकडून त्यांना दंडीत करण्यात अथवा त्यांच्याकडून चिरीमिरी लाटण्यात आजवर या वाहतुक पोलिसांनी समाधान मानलेले आहे. सिग्नलवर कोठेही वाहतुक पोलिस नसल्याने वाहनचालक सिग्नल मोडण्यावरच भर देतात. त्यामुळे वेगाने वाहन हाकताना वळसा मारणारी वाहने लक्षात न आल्यावर वाहनावर नियत्रंण ठेवणे अवघड होवून अपघात होतो. पामबीच मार्गावरील सीसीटीव्ही यंत्रणा हीदेखील एक संशोधनाचाच भाग आहे. या मार्गावर झालेल्या अपघाताचा अनेक ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये उलगडाही झालेला नाही. इतकेच काय सारसोळे जेटीवरील कोळी लोकांची जाळी अज्ञात समाजकंठकांनी जाळून आरामात पामबीच मार्गावरून फरार झाले. सीसीटीव्ही काहीही न सापडल्याने आजही संबंधित अज्ञात समाजकंठक फरारच आहेत. पामबीच मार्गावर चौकालगत सिग्नलजवळ वाहतुक पोलिस उभे राहील्यास किमान ९० टक्के अपघातांना आळा बसण्यास मदत होईल. त्याचबरोबर वाहनचालकांना वाहतुक विभागांकडून प्रबोधनही होणे आज काळाची गरज आहे. कारण या मार्गावर वेगाने वाहन हाकण्याच्या नशेपायी हजारोच्या संख्येने महिला आजवर विधवा झाल्या आहेत. अनेक घरांना कर्ता पुरूष गमविल्याने अपंगत्व आलेले आहे. कित्येक मुलांवर अनाथ होण्याची पाळी आलेली आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे, याकरता कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. वाहनचालकांना प्रबोधन, सिग्नल यंत्रणेवर वाहतुक पोलिस हा दुहेरी उपाय अवलंबिल्यास पामबीच मार्गाला भविष्यात कोणीही मृत्यूचा सापळा संबोधण्याचे धाडस कोणीही दाखविणार नाही.
-संदीप खांडगेपाटील -८०८२०९७७७५
साभार :- दै. जनशक्ती, मुंबई आवृत्ती
(पामबीच मार्गावरील वाढत्या अपघातावर प्रकाशझोत टाकणारा लेख महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांचा दै. जनशक्तीच्या ५ डिसेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेला आहे. संदीप खांडगेपाटील हे १९९२ सालापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून स्तंभलेखक, कॉलेज वार्ताहर, मंत्रालय प्रतिनिधी, महापालिका प्रतिनिधी, उपसंपादक, कार्यकारी संपादक, संपादक अशा विविध पदावर त्यांनी या कालावधीत काम केले आहे. सध्या दै. जनशक्तीमध्ये वृत्तसंपादक पदावर कार्यरत असून त्यांचा लेख आम्ही आमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा प्रसिध्द करत आहोत.
– अनंतकुमार गवई़ ,व्यवस्थापक , नवी मुंबई लाईव्ह.कॉम)