अनंतकुमार गवई
* वाशीतील एमजीएम रुग्णालयावर वाहन पार्कींग प्रकरणी गुन्हा दाखल करा
* महानगरपालिकेच्या कारवाईकडे नवी मुंबईकरांचे लक्ष
* नागरिकांनी केली ‘वॉक विथ कमिशनर’मध्ये तक्रार
नवी मुंबई ः महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाची संक्रात कोणावर कोसळेल आणि कोणाचा बीपी हाय करेल याचा आता काहीही नेम राहीलेला नाही. आयुक्त मुंढेंच्या ‘वॉक विथ कमिशनर’ अभियानामुळे नवी मुंबईकर थेट संपर्क साधत असल्यामुळे नवी मुंबईकरांना समस्या मांडणे सोपे होवू लागले आहे. शनिवारी वाशीत झालेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ अभियानात एमजीएम रूग्णालयासमोर होत असलेल्या पार्किगमुळे निर्माण होणार्या वाहतुक कोंडीच्या समस्येचा पाढा स्थानिक नागरिकांनी वाचला. ‘एक दिन का सीएम’ अशा थाटात धडाकेबाज निर्णय घेणार्या तुकाराम मुंढेंनी थेट एमजीएम रूग्णालयावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिल्यामुळेच ‘कलियुगातील तुकारामांच्या ओव्यांची आता एमजीएम रूग्णालयाला धडकी’ अशी चर्चा नवी मुंबईकरांमध्ये सुरू झालेली आहे.
वाशी मधील एमजीएम रुग्णालयात येणारे नागरिक त्यांची वाहने रुग्णालय समोरील रस्त्यावर पार्कींग करत असल्याने रुग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा, असे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाशी येथे संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे वाहन पार्कींग प्रकरणी एमजीएम रुग्णालय व्यवस्थापनावर महापालिकातर्फे नेमकी कोणती कारवाई होते, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
वाशीतील एमजीएम रूग्णालयात येणारे रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक रुग्णालय समोरील रस्त्यावर वाहनांची पार्कींग करतात. अनेकदा या वाहनांची रांग वाशी पोलीस स्टेशनपासून एनएमएसए क्लबपर्यंत जाते. तसेच काही वेळा रुग्णालय समोरील रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क केली जातात. यामुळे या रस्त्यावरुन येजा करणार्या अन्य वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील वाहन पार्कींग प्रकरणी एमजीएम रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात केली. त्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच एमजीएम रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरवर कारवाई केल्याची आठवण नागरिकांना करून दिली.
एमजीएम रुग्णालयात येणार्या नागरिकांच्या वाहनांचे पार्कींग रुग्णालय समोरील महापालिका रस्त्यावर होऊन वाहतुकीची कोंडी होत असेल तर दोन वेळा रस्त्यावर वाहने पार्कींग करणार्यांना समजावून सांगा. त्यानंतरही वाहनांची एमजीएम रुग्णालय समोरील रस्त्यावर पार्कींग होत असेल, तर त्या वाहनचालकांवर नव्हे,तर एमजीएम रुग्णालय व्यवस्थापनावरच गुन्हा दाखल करा, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात संबंधित अधिकार्यांना दिले.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १० डिसेंबर रोजी वाशी सेक्टर-८ मधील वीर सावरकर उद्यानात नागरिकांशी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांतर्गत थेट संवाद साधला. यावेळी रस्त्यावरील वाहन पार्कींग प्रकरणी एमजीएम रुग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.
दरम्यान, नियमानुसार वागण्याच्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रोखठोक भुमिकेमुळे आमचे प्रश्न मार्गी लागत आहेत, अशी प्रतिक्रीया तक्रारकर्त्या नागरिकांनी दिली.