मुंबई, अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित जागेवर भूमिपूजन सोहळा होईल. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते लवकर शिवस्मारकाचे भूमिपूजन होईल अशी माहिती दिली होती.
शिवस्मारकाचा आराखडा तयार असून, स्मारकाच्या कामाचे काटेकोर नियोजन करून विविध कामांचे टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. शिवस्मारकाच्या कफ परेड येथील कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी प्रथमच भेट देऊन स्मारकाच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक घेतली होती.
शिव स्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी बीकेसी येथे जाऊन मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करतील त्यानंतर त्यांची वांद्रयात जाहीर सभा होईल. आगामी मुंबई महापालिका निवडणूक, मराठा आरक्षणासाठी निघणारे मोर्चे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मुंबई दौरा महत्वपूर्ण रहाणार आहे.