नवी मुंबई / अनंतकुमार गवई
नेरूळ सेक्टर आठमधील एमजीएम शाळेमध्ये एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याने नवी मुंबईच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून शाळेच्या नावलौकीकालाही काळीमा फासला गेला आहे. मंगळवार, १३ डिसेंबर रोजी नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने या घटनेच्या विरोधात एमजीएम शाळेच्या प्रवेशद्वारावर सकाळी ११ वाजता निदर्शने केली जाणार असून यावेळी ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारेही उपस्थित राहणार आहेत.
एमजीएम शाळेत घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे पालक व विद्यार्थीनीमध्ये एकप्रकारचे भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची तड लावण्याकरीता शिवसेना सातत्याने पाठपुरावा करत आहे. ठाण्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्यासह नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी सातत्याने या घटनेमुळे शिक्षकावर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करत आहेत. पालकांना दिलासा देण्याकरीता उद्या शिवसेनेेचे पदाधिकारी खासदारांसमवेत प्रवेशद्वाराच्या ठिकाणी उभे राहून पालकांशी चर्चा करणार आहेत.
१३ डिसेंबर रोजी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा,बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शिवसेना नवी मुंबई जिल्हा संघठक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने, महिला शहर संघठक सौ. रोहिणी भोईर, उपशहरप्रमुख गणपत शेलार , महाराष्ट्र शिववाहतुक सेना नवी मुंबई अध्यक्ष दिलीप आमले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. स्थानिक शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे आणि युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपअधिकारी निखिल मांडवे यांनी या कार्यक्रमाबाबत स्थानिक जनतेच्या भेटीगाठी घेवून जनजागृती केली आहे. प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर फलक, सोशल मिडीयाच्या माध्यमातून अभियान, प्रत्यक्ष गाठीभेटी यातून नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे आणि युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपअधिकारी निखिल मांडवे यांच्यासह स्थानिक भागातील शिवसेना तसेच युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी कार्यक्रमाविषयी चर्चा केली आहे. नेरूळ पोलिसांकडून शांततामय मार्गाने हा कार्यक्रम करण्याच्या सूचना स्थानिक शिवसेना पदाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.