** या घटनेची वाच्यता होवू नये म्हणून पोलिसांनीच केला दीड महिना जिवाचा आटापिटा
** यापूर्वी याच शिक्षकाच्या विरोधात तब्बल १८ तक्रारी येवूनही शाळेने केली होती याच शिक्षकाची पाठराखण
** पिडीत बालिकेच्या पालकांची महिला आयोगाकडे धाव
** सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे याप्रकरणातील पोलिस तपासाचे वाभाडे काढण्याची शक्यता
नवी मुंबईः विद्यार्थीनीवर शिक्षकानेच अत्याचार करण्याची घटना नेरूळमधील एमजीएम शाळेत घडल्याने नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले असून याप्रकरणी शाळेवर व स्थानिक नेरूळ पोलिसांकडे आता जनसामान्यांकडून संशयाने पाहिले जावू लागले आहे. गुन्हा दाखल होवून दीड महिना उलटला तरी नराधम शिक्षक अजूनही फरारच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत असलेल्या गृहखात्याचा नेरूळ पोलिसांवर कोणताही अंकुश नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याचा आरोप आता नेरूळवासियांकडून केला जावू लागला आहे.
नेरुळ सेक्टर- ८ मधील महात्मा गांधी मिशन शाळेमध्ये सातवी मधील बालिकेवर अत्याचार करणारा नराधम शिक्षक अद्यापी मोकाटच असून, नेरुळ पोलिसांनी एक महिन्यापूर्वी नोंदलेल्या या गुन्ह्यात तपास कामात केलेली दिरंगाई याला कारणीभूत ठरली आहे. सदर गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तब्बल दुसर्या घटनेत नवी मुंबई पोलिसांनी तपास कामामध्ये दिरंगाई केल्याचे समोर आले आहे. आता तर पीडित शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची वाच्यता कुठे होऊ नये म्हणून पोलिसांनी अक्षरशः दीड महिने जीवाचा आटापिटा केल्याचे समोर आले आहे.
नेरुळ मधील एमजीएम शाळेतील अवघ्या तेरा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणारा नराधम शिक्षक हरिशंकर शुक्ला इंग्लिश विषय शिकवत होता. वर्गात शिकविताना हरिशंकर शुक्ला याने विद्यार्थीनींना अश्लील शेरेबाजी करण्याच्या १८ तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, शाळा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. शाळा व्यवस्थापनाने या नराधम शिक्षकाला पाठीशी घातल्यावर आता पोलिसांनी देखील या शिक्षकाला वाचविण्यासाठी पाठीशी घातले आहे. महात्मा गांधी जयंती दिनी अर्थात २ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्यावर तपास अधिकारी वासुदेव मोरे यांनी तपास कामात ढिलाई दाखविल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे या पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीच्या नावाखाली अडीच तास बसवून ठेवत घटनेचे आंबट वर्णन या निष्पाप बालिकेकडून ऐकून घेण्यात धन्यता मानली असल्याचे स्पष्ट होऊन देखील संबंधित अधिकार्यांवर वरिष्ठानी कारवाई केलेली नाही. याउलट पोलीस या प्रकरणाची अधिक वाच्यता होऊ नये म्हणून धडपडताना दिसत आहेत. आरोपीला वाचविण्याचा प्रकार पोलिसांनी खारघर मधील बालिका मारहाण प्रकरणात केला होता.
नेरुळ मधील गुन्हा देखील पोस्को या कलमाखाली नोंदला असताना पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात टाळाटाळ केल्याने अखेर आरोपी शिक्षक हरिशंकर शुक्ला फरार होण्यात यशस्वी झाला असून, आता पीडित बालिकेच्या पालकांनी महिला आयोगाकडे धाव घेतली असून, आमदार सौ. मंदाताइर्र म्हात्रे या नागपूर मध्ये सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात नवी मुंबई पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढणार आहेत.
नेरुळ मधील बालिका अत्याचाराच्या घटनेबाबत पोलीस मौन धारण करून अजून देखील या प्रकरणाची अधिक वाच्यता होणार नाही याची काळजी घेताना दिसत आहेत. शाळा व्यवस्थापन देखील आरोपी शिक्षकाला पाठीशी घालत असून, पीडित मुलीच्या पालकांवर दबाव आणत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर गर्भपात करावा लागला. दोन वेळा अत्याचार करणारा नराधम शिक्षक हरिशंकर शुक्ला पोलिसांच्या हलगर्जी कारभारामुळे पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. मुलींची छेडछाड करणार्या शिक्षकाच्या तक्रारी केल्यावर देखील शाळा व्यवस्थापनाने शिक्षकाला पाठीशी का घातले?, याबद्दल जाब विचारण्याची मागणी केली जात आहे. नराधम शिक्षकाला पाठीशी घालणार्या शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांवर कारवाई केली नाही तर आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे. जागरूक शिवसैनिकानेच सदर प्रकरण उजेडात आणले आहे.