नवी मुंबई / अनंतकुमार गवई
महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे या विरोधात महापालिकेच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाया हाती घेण्यात आल्या असून आज कोपरखैरणे विभागात 2 रेस्टॉरंट / बार वर तसेच मार्जिनल स्पेसमधील शेडवर कारवाया करण्यात आल्या.
कोपरखैरणे रेल्वेस्टेशन समोरील क्वॉर्टर रेस्टॉरंट / बार मार्जिनल स्पेसचा अनधिकृतरित्या बांधकाम करून वापर करीत होते. तसेच से. 1 मधील आदर्श रेस्टॉरंट / बार स्टिल्ट जागेत सुरु होता. या दोघांनाही महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. तरीही कोणताही प्रतिसाद न देणा-या या दोन्ही बांधकामांवर निष्कासीत करण्याची कारवाई करण्यात आली.
त्याचप्रमाणे से. 1 ए मधील 8 दुकानांवर मार्जिनल स्पेसमध्ये शेड उभारल्याबद्दल कारवाई करण्यात येऊन शेड हटविण्यात आल्या आहेत. या सर्व कारवायांमध्ये 75 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली आहे. त्याशिवाय नागरिकांना रस्ते व पदपथ चालावयास व रहदारीस मोकळे मिळावे यादृष्टीने गुलाब सन्स डेअरीच्या समोरील पदपथ/रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई कऱण्यात आली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त अशोक मढवी व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने या अतिक्रमण विरोधी धडक कारवाया करण्यात आल्या आहेत.