नवी मुंबई / संदीप खांडगेपाटील
पुण्यापाठोपाठ नवी मुंबई शहराला विद्येचे माहेरघर संबोधले जात आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात ऐरोली ते बेलापुरदरम्यान शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जाळे विखुरले गेले आहे. आयसीएल कॉलेज हे एक वाशी नोडमधील एक प्रतिष्ठित व नामाकिंत कॉलेज. या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी दहावीनंतर विद्यार्थी विशेष प्राधान्य देत असतात. पण आज या कॉलेजमध्ये फेरफटका मारला असता गुराचा कोंडवाडा तरी बरा,अशी या कॉलेजची अवस्था आहे. विविध समस्यांच्या विळख्यात हे कॉलेज अडकले असून या कॉलेजची आजची अवस्था बडा घर आणि पोकळ वासा या स्वरूपाची झालेली आहे.
नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर आठमधील एमजीएम शाळेमध्ये एका अल्पवयीन शालेय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यावर सर्वच शाळा-महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. नवी मुंबई युवा सेनेचे उपविधानसभा अधिकारी निखिल मांडवे यांनी आपल्या युवा सेनेच्या पदाधिकार्यांसह बुधवारी दिवसभर या महाविद्यालयात टेहळणी केली असता त्यांना या कॉलेजच्या बाहेरील व अंर्तगत भागातील सुरक्षा व्यवस्था कोठेही नसल्याचे भयावह सत्य निदर्शनास आले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर कोठेही सुरक्षा व्यवस्था दिसून आली नाही. युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कॉलेजमध्ये तासभर ईकडून तिकडे भटकत असतानाही त्यांना कोठेही हटकण्यात आले नाही. कॉलेजच्या अंर्तगत व बाह्य भागात कोठेही सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांकडून व्यायामशाळेच्या नावाखाली ठराविक वार्षिक निधी आकारण्यात येत असला तरी विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची व्यायामशाळा कॉलेजकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. कॉलेज आवारामध्ये सर्वत्र गटारे उघडीच असून कोठे पाणी वाहते तर कोठे गटारांमध्ये पाणी तुंबलेले आहे. या उघड्या गटारांची दुर्गंधी विद्यार्थ्यांना सहन करावी लागत असून गटाराभोवती घोंघावणार्या डासांमुळे विद्यार्थ्यांना मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराची लागण झालेली आहे. कॉलेजच्या अंर्तगत व बाह्य भागातही कॉलेज व्यवस्थापन स्वच्छतेबाबत उदासिनच आहे. कॉलेजमधील शौचालयातील खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत. नळही नादुरूस्त असून नळ सतत वाहतच असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. नळ दुरूस्तीचेही सौजन्य कॉलेजकडून दाखविले जात नाही. कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता कॉलेजकडून कॅन्टीनचीही सुविधा नाही. स्वच्छतेचा अभाव असल्याने सर्वत्र धुळच धुळ पहावयास मिळते. काही विद्यार्थ्यांना या धुळीच्या त्रासामुळे श्वसनांचे विकारही जडल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे.
कॉलेजच्या क्रिडांगणाच्या बाबतीत तोच कित्ता कॉलेज व्यवस्थापणाकडून गिरविण्यात येत आहे. क्रिडांगणावर कोठे नळाचे वाहणारे पाणी, तुटलेल्या पाईपातून गळणारे साचलेले पाणी यामुळे क्रिडांगणाच्या काही भागात पाण्याचे डबके तयार झाले असून क्रिडांगणाच्या काही भागामध्ये सिमेंटच्या ठोकळ्यांचे ढिगारे रचलेले पहावयास मिळतात. कॉलेजच्या बाहेरील व अंर्तगत भागात तसेच वर्गामध्ये वायरी लटकत असून काही भागात पंखे बंद पडलेले आहेत. वाहता विद्युत प्रवाह असणार्या वायरी लटकत असल्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका कायम आहे.
आयसीएल कॉलेजमध्ये यासह अन्य विविध समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याने झक मारली आणि येथे शिक्षणासाठी आलो अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षणासाठी कॉलेजमध्ये आलो का समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या कोंडवाड्यात आलो, तेच समजत नसल्याचे काही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
साभार – दै. जनशक्ती , मुंबई आवृत्ती