मुंबई / श्रीकांत पिंगळे
* वेतन विलंबामुळेच शिक्षकांनीच बंद पाडल्या शाळा
*पालकांमधील संभ्रम अद्याप कायम
* ट्री हाऊस प्रशासनाकडून लेखी आश्वासनासाठी पालकांची धडपड सुरू
गेल्या सहा महिन्यांपासून वेतन नसल्याने ट्री हाऊसच्या पूर्व प्राथमिक वर्गांच्या तब्बल 100 हून अधिक शाखा अचानक, कोणतीही पूर्व सूचना न देता बंद पडल्याने देशभरात एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाच्या शुक्रवारी तिसर्या दिवशी ही या शाखांतील पालकांना आणि कर्मचार्यांना मात्र कोणताच दिलासा मिळालेला नाही. एकीकडे अद्यापही ट्री हाऊसच्या सर्व शाखांना टाळे लागले असल्याने पालकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे तर दुसरीकडे जोपर्यंत आमचे पगार देण्यात येत नाही, तोपर्यंत काम न करण्याचा आक्रमक पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात ट्री हाऊसच्या 100 हून अधिक शाखा असून या शाखांमधील शिक्षकांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. तर बुधवारी या शाखांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र पाठवून शाळेत न येण्याची सूचना केल्याने पालकांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. त्यामुळे याप्रश्नी पालकही हवालदिल झाले होते. याप्रकरणी ट्री हाऊस प्रशासनाकडून गुरूवारी पत्रकारांशी बोलताना लवकरच हा प्रश्न सोडविला जाईल, असे जाहीर केले होते. व्यवस्थापनाने सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी पालक आणि शिक्षकांची लेखी आश्वासनासाठी धडपड सुरू झाली आहे.
शुक्रवारी अनेक पालकांनी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा ट्री हाऊसच्या शाखा आणि कार्यालयास भेट दिली. मात्र कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन न देण्यात आल्याने पालकांमध्ये संभ्रम कायम असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.
तर ट्री हाऊस मधील जवळपास सर्वच शिक्षकांनी आक्रमक पवित्रा धारण करीत जोपर्यंत पगार दिला जात नाही. तोपर्यंत कामावर येणार नाही, असे जाहीर केल्याने येत्या काळात हा प्रश्न आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.
*************
चौकट
मुलांचा दाखल तरी मिळणार की नाही?
पोलिसांनी पालकांची तक्रार घेतली नसून फक्त घेतल्याची माहिती काही पालकांनी दिली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांनी येथील प्रवेशासाठी हजारो रुपये फी भरली होती आणि अचानक या शाखा आता बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय येथे शिकणार्या मुलांना नर्सरी सोडल्याचा दाखलाही मिळण्याची शक्यता अंधुक असल्याने आतासरकारकडूनच मदतीची अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत.