आमदार संदीप नाईक यांची औचित्याच्या मुद्याद्धारे मागणी
नागपूर/प्रतिनिधी
आमदार संदीप नाईक यांनी शुक्रवारी विधानसभेत नवी मुंबईचे दोन महत्वाचे विषय औचित्याच्या मुद्याद्धारे विधानसभा अधिवेशनात मांडले. नवी मुंंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांवरील बंदी उठवावी तसेच सिडको वसाहती (कंडोमिनियम)अंतर्गत कामे करण्यास पालिकेला शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नवी मुंबई पालिकेची सार्वत्रिक निवडणुक एप्रिल २०१५मध्ये पार पडली. २० नोव्हेंबर २०१५ रोजी पालिकेच्या महासभेत प्रभाग समित्या गठित करण्यात आल्या. मात्र त्यानंतर या प्रभाग समित्यांना शासनाच्या नगरविकास विभागाने बंदी घातली. प्रभाग स्तरावरची विकासकामे या समित्यांच्या मार्फतच केली जातात परंतु गेल्या दिड वर्षात या समित्याच स्थापन झाल्या नसल्याने विकासकामे खोळंबली आहेत. प्रभाग समित्यांचा विकासनिधी लोकप्रतिनिधी विकासकामांसाठी वापरु शकत नाहीत असे सांगून या समित्यांवरील बंदी तातडीने उठविण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली.
नवी मुंबईतील सिडकोनिर्मित वसाहतींमध्ये (कंडोमिनियम) नागरी सुविधांची दुरवस्था झाली आहे. या वसाहतींमधून हजारो सर्वसामान्य नागरिक राहत असून वसाहतींमध्ये दुरुस्तीची कामे करणे त्यांना आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. म्हणून नवी मुंबई महापालिकेने लोकहिताच्या दृष्टीने नागरी सुविधा पुरविण्याचे काम या वसाहतींमधून सुरु केले होते. परंतु या कामांना देखील शासनाने बंदी घातली आहे. ही बंदी त्वरीत उठवून वसाहतीअंतर्गत नागरी कामे करण्यास नवी मुंबई पालिकेला परवानगी देवून वसाहतींमधील हजारो नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी देखील आमदार संदीप नाईक यांनी औचित्याचा मुददा उपस्थित करुन केली आहे.