नवीमुंबई / सुजित शिंदे
घणसोली नोड सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरीत झाल्याचा आनंद आपल्याइतकाच मलाही आहे, त्याबरोबरच आता जबाबदारी वाढल्याचीही जाणीव असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी विकसित झालेले सेक्टर 1 ते 7 आणि 9 तसेच विकसनशील असणारे सेक्टर 8, 21, 23 या क्षेत्रात पावसाळ्यापुर्वी आवश्यक सेवा पुरविल्या जातील असे सांगत घणसोली हा नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मध्यवर्ती नोड असल्याने व सर्वांगीण विकसनाची क्षमता असल्याने सर्वोत्तम नोड म्हणून आकाराला येईल असा विश्वास व्यक्त केला.
घणसोली, से.15 येथील एन.एम.एम.टी. बसडेपो परिसरात आयोजित ‘वॉक विथ कमिशनर’ या अभिनव उपक्रमाप्रसंगी आयुक्तांनी नागरिकांशी थेट सुसंवाद साधला. उपक्रमस्थळी सकाळी 5.45 पासूनच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षे प्रलंबित असणारा घणसोली नोड हस्तांतरणाचा प्रश्न आयुक्तांनी ठोस पावले उचलत अल्पावधीत मार्गी लावल्याबद्दल अनेक नागरिकांनी पुष्पगुच्छ देत आयुक्तांचे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले.
घणसोली नोडमधील नागरी सुविधांमध्ये मुख्यत्वे स्विमींग पुलसह खेळ आणि मनोरंजनाच्या विविध सुविधा उपलब्ध असणारे सेंट्रल पार्क मे अखेरपर्यंत पूर्णत्वास येईल असे सांगत ऐरोली व घणसोली यामध्ये रखडलेल्या पामबीच मार्गावर केबल स्टे ब्रीज बांधून हा मार्ग पुर्णत्वास नेला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे घणसोली नोडमध्ये उभारले जाणारे भव्यतम स्टेडियम नवी मुंबईच्या नावलौकीकात भर घालणारे ठरेल असे सांगत घणसोली हस्तांतरणाला काहीसा उशीर झाला असला तरी विकास मात्र वेगाने होईल असे सांगितल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरी सुविधा पुरविल्या जात असताना नागरिकांनीही आपले शहराविषयी, समाजाविषयी असलेले उत्तरदायित्व लक्षात घेऊन छोट्या छोट्या सामाजिक जबाबदा-यांचे भान ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. कुठेही न थुंकणे, कुठेही कचरा न टाकणे, कच-याचे ओला व सुका असे घरापासूनच वर्गीकरण करुन कचरागाड्यांमध्ये वेगवेगळा देणे, पाणी गरजेपुरतेच वापरून अपव्यय टाळणे, वाहतुकीचे नियम पाळणे, पार्कींग योग्य ठिकाणीच करणे अशा अनेक लहान लहान बाबींची काळजी नागरिकांनी घेतली तर आपले शहर अग्रगण्य राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याकरीता नागरिकांचा प्रत्यक्ष कृतीशिल सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सहज व सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने इ-गव्हर्नन्सवर भर दिला असून विविध सेवा www.nmmc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे “nmmc e-connect” हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून नागरिक आपल्या स्मार्ट मोबाईलच्या टच वर आपला कर भऱणा करू शकतात. तसेच विभाग कार्यालयात स्वॅप मशीन उपलब्ध करून देण्यात आले असून त्याव्दारेही कर भरणा करता येऊ शकतो. नागरिकांनी या सर्व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
त्याचप्रमाणे वेबसाईटवर व ॲपवर नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात न जाता घरबसल्या आपल्या तक्रारी/सूचना करता याव्यात याकरीता ‘तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System)’ कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांनी त्यांच्या सूचना/तक्रारी यावर कराव्यात, जेणेकरुन त्यांना तक्रार क्रमांक प्राप्त होईल व ते आपल्या तक्रारीवर सुरु असलेली कार्यवाही जाणून घेऊ शकतात. तक्रार निवारणाचा कालावधी निश्चित असल्याने नागरिकांच्या तक्रारींचे विहीत कालावधीत निराकरण होणे शक्य होत असून नागरिकांना श्रेणी देऊन कामाचे मु्ल्यांकन करण्याची शिवाय तक्रारींचे निराकरण झाले नाही तर पुन्हा तक्रार दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र सरकारने स्वच्छ सर्व्हेक्षण हाती घेतले असून स्वच्छतेविषयीच्या तक्रारी / सूचना मांडण्यासाठी “swachhata MoUD” हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून स्वच्छतेविषयीच्या आपल्या तक्रारी – सूचना छायाचित्रासह त्यावर पाठवाव्यात, जेणेकरून त्याचे 12 तासात निवारण होईल अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत नागरिकांच्या अभिप्रायांना व शिफारशींनाही गुण आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने हे मोबाईल ॲप नवी मुंबई स्थान सिलेक्ट करून डाऊनलोड करून घ्यावे व देशातील 500 शहरांमध्ये आपल्या शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
शहराच्या विद्रुपीकरणाला प्रतिबंध करून शहरातील विकास कामांमध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन करणा-या महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीचे आजच्या “वॉक विथ कमिशनर” उपक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध वयोगटातील अनेक नागरिकांनी कौतुक करतानाच घणसोली नोडचा विकास असाच गतीमानतेने होईल असा टाळ्यांच्या गजरात विश्वास व्यक्त केला.