नवी मुंबई : आयुष्यात स्वकर्तृत्वाने आणि स्वतःच्या बुद्धीने मोठे व्हा. ध्येय निश्चित करा आणि जीवन घडवा असा मोलाचा सल्ला लोकनेते गणेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या संसदीय कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने वाशीतील मॉडर्न कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी शनिवारी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा शुभारंभ लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. नवी मुंबईतील शेतकर्यांच्या जमिनी सिडकोने घेतल्यावर १९९० साली शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना आपण नवी मुंबईतील स्थानिक शेतकर्यांच्या हितासाठी १२.५० टक्के योजनेची मागणी केली आणि पवार साहेबांनी ती लगेच मान्य केली त्यामुळे खर्या अर्थाने १२.५० टक्के योजनेचे जनक पवार साहेबच असल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. पवार साहेबांनी ५० वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत शेती, उद्योग, कला, क्रीडा, संस्कृती या सर्वच स्तरावर जात, धर्म, पंत, वर्ण, वर्ग या पलीकडे जात चौफेर विकास कार्य केले. गेल्या ५० वर्षांत त्यांच्यावर अनेक आरोपांच्या फैरी झाल्या. त्यांनी त्या फैरी अंगावर घेत आपले जीवन संयमाने आणि नेटाने पुढे नेले असल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. जीवनशैली साधेपणाची असली पाहिजे जीवनात संकटे येतात त्यांचा मुकाबला करावा लागतो. परंतू त्यातून योग्य मार्ग काढला पाहिजे असे सांगत लोकनेते नाईक यांनी विद्यार्थ्यांना शरदचंद्र पवार यांच्या जीवनावरील पुस्तके वाचण्याचा देखील सल्ला दिला. त्यामुळे जीवन जगताना त्याचा नक्की फायदा होईल असेही ते म्हणाले.
वक्तृत्वाचा संबंध आपल्या जीवनात लहान असल्यापासूनच येतो. आपल्या मनातील बोलण्याची भीती दूर होण्यासाठी वक्तृत्व खूप महत्वाचे असल्याचे महापौर सुधाकर सोनावणे म्हणाले. एखाद्या माणसाच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होणे ही एक मोठी उपलब्धी असल्याचे सोनावणे म्हणाले. शरदचंद्र पवार हे सर्वगुण संपन्न असलेले नेते आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी मिळण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग नक्की होणार असल्याचे सोनावणे यांनी सांगितले.
या वत्कृत्व स्पर्धेच्या माध्यमातून शरदचंद्र पवार यांचे व्यक्तीमत्व व समाजकार्य समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. त्या संधीचे सोने करण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी विद्यार्थ्यांना केले. राजकारणात आणि समाजकारणात अविरत ५० वर्षे पूर्ण करणारे एकमेव नेते शरदचंद्र पवार साहेब असल्याचे सुतार म्हणाले या स्पर्धेत विजेत्या होणार्या स्पर्धकांचा सत्कार पवार साहेबांच्या हस्ते होणार असल्याने ते विजेते भविष्यात राजकारणी किंवा समाजकारणी होणार यात शंका नसल्याचे सुतार यांनी सांगितले.
पवार साहेबांच्या संसदीय जीवनाला ५० वर्ष झाली त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध स्तरावर ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज आणि बाह्य स्तरावर सुद्धा पवार साहेबांचे अष्टपैलू असलेले व्यक्तिमत्व या विषयी विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान व्हावे आणि त्यांचे जीवन सुद्धा तशाच प्रकारे घडावे यासाठी अशा स्पर्धा जिल्हा स्तरावर आणि त्यानंतर राज्यस्तरावर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आज वक्तृत्व स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हास्तरावर घेण्यात आल्या असून यामध्ये विजयी होणार्या स्पर्धकांना १३,१४ आणि १५ जानेवारी २०१७ रोजी बारामतीमध्ये होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. तसेच शरदचंद्र पवार यांच्या सोबत संवाद साधण्याची आणि बारामती येथील विविध संस्था पाहण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून मॉडर्न कॉलेजचे प्राध्यापक माने सर, रा.फ. नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक रवींद्र पाटील सर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाला नगरसेवक प्रकाश मोरे, नगरसेवक शशिकांत राऊत, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेविका संगीता बोर्हाडे, नगरसेवक अशोक गावडे, नगरसेवक लीलाधर नाईक, माजी नगररसेवक बाळकृष्ण पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, राष्ट्रवादी युवकचे चिटणीस कौस्तुभ पाटील, ऐरोली विधानसभा संघाचे युवक अध्यक्ष राजेश मढवी, वाशी तालुका अध्यक्ष राजू शिंदे, यशवंत पाटील,गणेश पाटील, आत्माराम पाटील, यशवंत तांडेल, भालचंद्र नलावडे, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य शिवणकर सर, अनिल लोखंडे, शिरीष वेटा, जगदीश पाटील, टाव्हरे सर, रॉबिन मढवी, महादेव पवार, अमित मढवी, राकेश तांडेल, नारायण मुकादम, रतन म्हात्रे, बेंद्रे, अनिकेत ओंढे, अश्वजीत जगताप, सागर औटी तसेच आदी मान्यवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.