कोटयावधी रूपयांची तरतूद
मुंबई \ जयश्री पाटील
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते त्यामुळे पालिकेने शाळांची दुरूस्ती आणि पुर्नबांधणीच्या कामांचा धुमधडाका सुरू केला आहे. त्यासाठी चार शाळांच्या पूनर्बांधणी आणि आठ शाळांच्या दुरूस्तीसाठी पालिकेने सुमारे 70 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये येऊ घातली आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते. आचारसंहितेच्या काळात कामे अडकून राहू नयेत यासाठी पालिकेने शाळांची दुरूस्ती आणि पूर्नबांधणीच्या कामाचा धडाका सुरू केला आहे. पालिकेकडून नव्या वर्षात नव्याने ४ शाळा बांधण्यात येणार आहेत. या कामांचे प्रस्ताव स्थायी समिती तसेच स्थापत्य समितीच्या मंजूरीसाठी आले आहेत. मुलुंड येथील मिठागराच्या जागेत अत्यंत दयनीय स्थितीत पालिकेची शाळा होती. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ही शाळा अशीच खंडर झाली आहे. आता या शाळेची पुनर्बांधणी होणार आहे. मोकळ्या मिठागराच्या भुखंडावर पालिकेच्या चार मजली शाळेच्या इमारतीचे बांधकाम नव्याने होणार आहे. 6 हजार 212. 60 चौरस मीटर इतके क्षेत्रफळावर ही शाळा उभी केली जाणार आहे. 16 कोटी 88 लाख रुपये या शाळेसाठी खर्च येणार आहे. वाशीनाका चेंबूर येथे आशिषबाग भागात चार मजली नवीन पालिका शाळेचे बांधकाम होईल. त्यासाठी 14 कोटी 8 लाख रुपये खर्च येईल. शाळेचे बांधकाम 4 हजार 829.50 चौरस मीटर इतके असेल. बोरिवळी पूर्व येथील राजेंद्र नगर पालिका शाळेची दुरूस्ती 2 कोटी 46 लाख रुपयातून होईल. गेल्या अनेक वर्ष पाडलेली घाटकोपर येथील राजावाडी म्युनिसिपल शाळा पुन्हा उभी राहणार आहे. ती शाळा 45 वर्षांची जुनी होती. शाळेच्या पूनर्बांधणीसाठी 14 कोटी 95 लाख रुपये इतकी तरतूद केली आहे. गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी वसाहत क्रमाक 1 मध्ये पालिका शाळेची पूनर्बांधणी होईल. 58 हजार 126 चौरस मीटर जागेत ही शाळा उभी राहील त्यासाठी 17 कोटी 15 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
*****&***************
दुरूस्तीवरही कोटयावधीचा खर्च
घाटकोपर रमाबाईनगर पालिका शाळा क्र. 2 आणि 3 या शाळेच्या दुरूस्तीसाठी 3 कोटी 68 लाख रुपये इतक्या खर्चाची तरतूद केली आहे. बोरिवली येथील लालजी त्रीकमजी पालिका शाळा दुरूस्ती तीन मजली शाळेसाठी तितकीच तरतूद आहे. वांद्रे पूर्व बीकेसी पालिका शाळा, गोवंडी येथील रफिकनगर पालिका शाळा, घाटकोपर येथील कामराज नगर शाळा, चेंबूर पूर्व येथील सुभाषनगर पालिका शाळा, कुर्ला पश्चिम चांदिवली येथील संघर्षनगर मनपा शाळा,विलेपार्ले येथील मणिलाल सुंदरजी पालिका शाळा या शाळांच्या दुरूस्तीचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. या शाळांच्या दुरूस्तीवर प्रत्येकी सुमारे सव्वा कोटी ते दोन कोटी खर्च होणार असल्याचे सांगण्यात आले.