नवी मुंबई ः तळवली आणि गोठवली गावालगत सिडकोच्या जमिनीवर भुमाफियांनी केलेली अनधिकृत बांधकामे त्वरित तोडण्यात यावी तसेच संबंधितांवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका अधिकार्यांना दिले.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 17 डिसेंबर रोजी तळवली आणि गोठवली गावालगत अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या इमारतींची पहाणी केली. यामध्ये तळवलीतील दोन इमारतींचा आणि गोठवलीतील एका इमारतीचा समावेश आहे. या इमारती चार ते पाच मजल्यांच्या असल्याचे पाहून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना धक्का बसला. सिडकोच्या भूखंडावर कब्जा करून शेकडो चाळी या ठिकाणी वसवण्यात आल्या आहेत. येथील गल्ल्यागल्ल्यांमधून वाट काढत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे थेट या बेकायदा इमारतींपर्यंत पोहोचले आणि स्वत: येथील लोकांकडे सदर इमारती कोणी केल्या याची माहिती काढू लागल्यावर सर्व अधिकार्याच्या पायाखालची वाळूच सरकली. इमारती बांधणार्यांची नावे समजतात, त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्या अंतर्गत भूमाफीया बिल्डर आणि तेथे काम करणारे कामगार या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रये नागरे यांना दिले. तसेच पोलीसांनी देखील या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांचा शोध लावून चालू असलेली बांधकामे पाडण्यासाठी लवकरात लवकर पोलीस बळ उपलब्ध करून द्यावे, असे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पोलिसांना दिले. एक दोन नव्हे,तर पाच मजली बांधकामे होत असताना तुम्ही काय झोपा काढत होता काय?, असा जाब महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरे आणि उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांना विचारत त्यांना पैलावर घेतले. सदर बेकायदा बांधकामे आत्ताच्या आत्ता 2 तासात तोडून टाका असे आदेशही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. मात्र, प्रत्यक्षात या इमारतींना कोणतीही नोटीस महापालिका प्रशासनाने बजावली नसल्याने 24 तासांची नोटीस बजावून 19 डिसेंबर रोजी सदर इमारती पाडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
दौर्यात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदा बांधकामे तोडली नाही,तर तुमच्यावर कारवाई करेल, असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पटनिगीरे आणि नागरे यांना दिला.
दरम्यान, भूमाफियांसह बेकायदा बांधकामे होताना त्याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.