नवी मुंबई : क्रीडा क्षेत्रामध्ये नवी मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा यावर्षी देखील १९ डिसेंबरपासून २४ डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या पुढाकाराने सुरु झालेली ही प्रतिष्ठेची स्पर्धा नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन (एनएमएसए) अध्यक्ष आणि लोकनेते गणेश नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे, संचालक डॉ. अशोक पाटील, सहसचिव दत्तू पाटील, सहसचिव अरुण पाटील, सदस्य विजय पाटील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. वाशीतील एनएमएसएच्या आंतरराष्ट्रीय कोर्टवर आयडब्ल्यूटीसी स्पर्धेचा आज (सोमवारी) सायंकाळी सहा वाजता शुभारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या विजेत्यांसाठी २५ हजार डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. नवी मुंबईतील उगवत्या खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना टेनिसमधील आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ पाहता यावा यासाठी लोकनेते नाईक यांनी आयडब्ल्यूटीसी स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली. २०१३ पासून ही स्पर्धा भरविण्यात येत आहे. २०१३ साली २१ देशांमधील, २०१४ साली १९ देशांमधील, २०१५ साली १७ देशांमधील आंतरराष्टीय महिला खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या या वर्षी २२ देशांमधील आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू ज्यांची आंतरराष्ट्रीय क्रमवारी १२२ च्या पुढे आहे त्या सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये २२ भारतीय महिला खेळाडूंना या आंतरराष्ट्रीय टेनिस स्टारबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे. या २२ भारतीय महिला खेळाडूंमध्ये ४ नवी मुंबईतील महिला खेळाडूंचा देखील समावेश आहे.
सर्बिया देशाची नीना स्टोजानोविक ही १४२ रँकिंग असलेली खेळाडू स्पर्धेचे खास आकर्षण असणार आहे. दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने दुहेरी गटात एक लाख डॉलरचे बक्षीस विजेत्या पदासह प्राप्त केले असून तेवढ्याच रकमेच्या एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिने आता प्रवेश केला आहे. मागील वर्षी नीनाचे रँकिंग २७७ होते. मात्र यावर्षी तिने आपल्या खेळामध्ये कमालीची सुधारणा करत १४२ रँकिंग गाठले आहे. एनएमएसएची ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा ऑलिंपिकसाठी खेळाडू घडविणारी स्पर्धा ठरली आहे. भारताची प्रार्थना ठोंबरे आणि पोलंडची माग्दा लिणेट्टे या दोन खेळाडू एनएमएसएच्या स्पर्धेत खेळल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपापल्या देशाचे प्रतिनिधीत्व रिओ ऑलिंपिकमध्ये देखील केले होते. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा भरविणारी एनएमएसए ही १७ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद (फिफा) स्पर्धेची देखील सहआयोजक आहे. एनएमएसए क्लबच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झालेले आहेत.
आयडब्ल्यूटीसी स्पर्धेत सहभागी खेळाडू, देश आणि त्यांची क्रमवारी
खेळाडूचे नाव देश क्रमवारी
१) नीना स्टोजानोविक सर्बिया १४२
२) तारा मुरे ग्रेट ब्रिटन १६०
३) कोंन्नी पेरीन स्वित्झर्लंड १८२
४) तमारा झिदान्सेक स्लोव्हेनिया २३५
५) अकिको ओमाइ जपान २४२
६) शिहो अकीता जपान २५०
७) जिया जिंग लू चायना २६३
८) क्योका ओकामुरा जपान २६९
९) अंकिता रैना भारत २७०
१०) तेश्शाह फ्रांस २७३
११) वॅलेरिया स्ट्राखोवा युक्रेन २७५
१२) कॅटी डून्ने ग्रेट ब्रिटन ३१७
१३) वेलेंन्टयाना रशिया ३२१
१४) डियाना लॅटविआ ३२४
१५) पॉलिना मोनोवा रशिया ३३९
१६) ऍना मोर्गीना रशिया ३५०
१७) अनास्टॅशिया रशिया ३८६
१८) नोप्पावन थायलंड ४१६