महोत्सवाचे यंदाचे ११वे वर्ष, महोत्सवाला पाच लाख लोकांची हजेरी अपेक्षित
नवी मुंबई : अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट च्या विद्यमाने बुधवार, ४ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७ रोजी श्री गणेश रामलीला मैदान नेरुळ येथे आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील ग्राम संस्कृती, लोककला व लोक परंपरेचे जतन व्हावे, जुन्या जाणत्या कलावंतांचा गौरव व्हावा याच बरोबर येथील नवोदित कलावंतांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच नव्या विकासाबरोबर प्रवाहात येणार्या येथील नागर संस्कृतीला येथील मूळ संस्कृती कळावी. ग्राम संस्कृती व नागर संस्कृती यांच्यामध्ये विचारांचे आदान -प्रदान व्हावे व खर्या अर्थाने सांप्रदायिक एकता व एकात्मता वृध्दींगत व्हावी. याच उदात्त हेतूने महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच बच्चे कंपनीसाठी भव्य फनफेअर व खवय्यांसाठी खास आगरी-कोळी पद्धतीचे जेवणाची मेजवानी असणार आहे. या बरोबर बारा दिवस आगरी-कोळी गीतांचा तडका उपस्थितांचे मनोरंजन करणार आहे.
यंदा आगरी-कोळी महोत्सवाचे ११ वे वर्ष असून या महोत्सवामध्ये संगीत, भजने, आगरी-कोळी संस्कृतीची माहिती देणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम आदी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. याशिवाय खवय्यांसाठीदेखील या महोत्सवाविषयी कमालीचे आकर्षण असून विविध प्रकारचे मासे, सुकी मासळी, मटन, आगरी-कोळी पदार्थ खाण्यांसाठी विविध स्टॉल्समध्ये उपलब्ध असतात. याशिवाय दररोज व्यासपिठावरून सांयकाळी मनोरंजनात्मक सादर केली जाणारी लोकगीतेदेखील आगरी-कोळी संस्कृतीचा परिचय करून देतात. याशिवाय लहान मुलांसाठी फनफेअरच्या धर्तीवर विविध खेळणी असल्याने तब्बल १२ दिवस मुलांसाठी हा महोत्सव बालकोत्सवच बनतो. याशिवाय विविध पदार्थ विक्रीचे स्टॉल्सही लागत असल्याने लोणची, मसाले व अन्य साहीत्य खरेदीसाठी महिलांची गर्दी उसळलेली असते. शहरीकरणामुळे नव्याने रहावयास आलेल्या लोकांना स्थानिक भागातील आगरी-कोळी संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी हा महोत्सव सुरू करण्यात आला असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक असणारे शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख, माजी सिडको संचालक व नगरसेवक नामदेव भगत यांनी दिली.
या महोत्सवामध्ये नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरणसह मुंबईतील मुलुंड, भाडुंप, घाटकोपर, सायन-वडाळा, मानखुर्द या भागातून मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होत असतात. गेल्या वर्षी महोत्सवामध्ये तीन लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते. या महोत्सवामध्ये आगरी-कोळी लोकांचे श्रध्दास्थान असणारे एकवीरा आईचे मंदिर, ग्रामस्थांचे पुरातन घर, घरातील साहीत्य, शेतीची व मासेमारीची साधनेदेखील पहावयास मिळतात. या महोत्सवामध्ये सर्वसामान्यांबरोबरच नवी मुंबई, ठाणे, रायगडमधील सर्वपक्षीय नगरसेवक, आमदार, खासदार तसेच राज्यातील मंत्रीदेखील हजेरी लावतात. या महोत्सवाच्या आयोजनासाठी स्वत: नामदेव भगत यांच्यासह सभोवतालच्या परिसरातील ग्रामस्थ, भजनी मंडळे, सामाजिक संस्थादेखील आयोजनात हिरीरीने पुढाकार घेत असतात.