नवी मुंबईमधील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोठेही पहावयास मिळत नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे का, राष्ट्रवादी काँग्रेसची हतबलता ही आताची खरी परिस्थिती झालेली आहे याबाबत नवी मुंबईकर संभ्रमात पडलेला आहे. मोदी लाट येण्यापूर्वी अगदी लोकसभा निवडणूकीपूर्वी नवी मुंबई म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असेच चित्र दिघा ते बेलापुरदरम्यान विखुरलेल्या नवी मुंबईत पहावयास मिळत होते. लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल 47 हजारांनी पिछाडीवर होती. विधानसभा निवडणूकीत निवडणूकीअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईचे शिल्पकार असलेल्या लोकनेते गणेश नाईकांचा अवघ्या 1200 ते 1300 इतक्या निसटत्या मतांनी पराभव केला, तर ऐरोली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखल्या जाणार्या युवा नेतृत्व आमदार संदीप नाईकांनी 8500च्या फरकाने मोदी लाटेतही आपला गड कायम राखला. महापालिका निवडणूकीअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा असणारे बोनकोडे भाजपामध्ये दाखल होणार असल्याच्या वावड्या मोठ्या प्रमाणावर पसरल्या होत्या. वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी, पदाधिकार्यांनीदेखील योग्य निर्णय घेण्याची गळ लोकनेते गणेश नाईकांना घातली होती. तथापि देशाच्या राजकारणात मानाचे स्थान असणार्या शरद पवारांची साथ गणेश नाईकांनी व त्यांच्या परिवाराने, कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी सोडली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक गणेश नाईक व त्यांचे समर्थक घड्याळ हाताला बांधून लढले. त्यांनी महापालिकेत स्पष्ट बहूमताच्या जवळपास जाण्याइतपत मजल मारली. मोदी लाटेमुळे मंदाताई निसटत्या मतांनी विजयी झाल्या असल्या तरी आगामी विधानसभा निवडणूकीत लोकनेते गणेश नाईकच अर्थात आमचे दादाच आमदार असणार असे गणेश नाईकांच्या कडवट समर्थकांकडून कालपरवापर्यत बोलले जात होते. पण आज तसे बोलले जात नाही. लोकनेते गणेश नाईकांची राष्ट्रवादी काँग्रेस कोमात तर मंदाताई म्हात्रेंची भाजपा जोमात असेच चित्र गेल्या वर्षभरात नवी मुंबईमध्ये निर्माण झाले आहे. सत्तेवर असताना लोकनेते गणेश नाईकांकडून काही चुका झाल्या. त्या चुकांपासूनच बोध घेत त्या चुका टाळण्याचा प्रयत्न आमदार मंदाताई म्हात्रेंनी केल्यामुळे मंदाताईंच्या नेतृत्वाची पाळेमुळे जनसामान्यांमध्ये पसरू लागली आहेत, ही खर्या अर्थाने लोकनेते गणेश नाईकांसाठी व त्यांच्या समर्थकांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकनेते गणेश नाईकांनीच नवी मुंबईचा खर्या अर्थांने विकास केला आहे ही सत्याधिष्ठित वस्तूस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. जनता दरबाराच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी, समाजातील उपेक्षितांसाठी लोकनेते गणेश नाईकांनी कधीही हात आखडता घेतलेला नाही. जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकार्यांना वठणीवर आणत प्रशासनदरबारी गोरगरीबांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळू लागला होता. पण हा इतिहास झाला. वर्तमानात नवी मुंबईत काय चालू आहे याचा नवी मुंबईच्या शिल्पकारांनी वेळीच आढावा घेणे आवश्यक आहे. नवी मुंबईच्या अर्ध्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस जितकी भक्कम आहे, त्याच्याच विरूध्द बाजूचा प्रत्यय बेलापुर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत पहावयास मिळत आहे. मोदी लाटेतही संदीप नाईकांच्या ऐरोली गडाला तडा जावू शकला नाही. त्याला सर्वस्वी कारणीभूत संदीप नाईकांचे सावध, चाणाक्ष नेतृत्व, जनसामान्यांशी सातत्याने ठेवलेला जनसंपर्क आणि विविध कारणास्तव मतदारसंघाच्या कानाकोपर्यात सातत्याने केलेली पायपीट हेच आमदार संदीप नाईकांच्या यशाचे गमक मानावे लागेल. दादांनी कामे करूनही दादांना निसटता पराभव पत्करावा लागला. याला काही अंशी दादाच कारणीभूत आहेत, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. ऐरोलीत विधानसभा निवडणूकीत सर्व आघाड्यांवर स्वत: संदीप नाईक पुढे येवून लढले. उलटपक्षी बेलापुर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकनेते गणेश नाईकांनी त्यांच्या नगरसेवकांवर, कार्यकर्त्यांवर, समर्थकांवर विश्वास ठेवला. स्वत: आघाडीवर येवून लढणे आणि सेनापतींच्या, शिलेदारांच्या जीवावर लढणे यातील तफावत इतिहास कालापासून आपणास पहावयास मिळाली आहेे. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणूकीत ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघामध्ये पहावयास मिळाली. लोकनेते गणेश नाईक आणि फिनिक्स पक्षाचे साम्य असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून नेहमीच केला जातो. 1999च्या निवडणूकीत जनतेेने निवडून दिलेल्या लोकनेते गणेश नाईकांना कांदा बटाटा मार्केटमध्ये घडलेल्या तत्कालीन नाट्यमय घडामोडींमुळे आघाडीवर असतानाही अवघ्या 2700 मतांनी पराभूत होण्याची पाळी आली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत गणेश नाईकांनी एक लाखापेक्षा दणदणीत मताधिक्य मिळविले. याच इतिहासाचा दाखला आजही गणेश नाईकांच्या समर्थकांकडून देण्यात येत आहे. पण त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये जमिन आसमानचा फरक आहे. त्यावेळी बेलापुर हा विस्तीर्ण मतदारसंघ होता. आता त्या मतदारसंघाचे पाच विधानसभा मतदारसंघामध्ये विभाजन झालेले आहे. मतदारसंघ जितका लहान असतो, तितकी प्रस्थापितांची डोकेदुखी अधिक असते. पूर्वी परप्रातिंयाचा एकगठ्ठा व एकमुखी पाठिंबा गणेश नाईकांनाच होता, पण आज हेच हक्काचे मतदार मोदीप्रेमामुळे भाजपाच्या छावणीत दाखल झाले आहे. नवी मुंबईत आगरी-कोळी समाज बांधवांकरीता भाजपा आमदार मंदाताई म्हात्रेंकडून सातत्याने विविध कार्यक्रम राबविले जात असल्याने याही मतदारांमध्ये कमळाबाईचे आकर्षण वाढीस लागले आहे. तुकाराम मुंढेंच्या पालिका आयुक्तपदावर आगमनापासून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात वाद चिघळत गेला. त्यातून प्रभागाप्रभागातील विकासकामांचा बोर्या वाजला आहे. नवी मुंबईतील भाजपाचा वाढता प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंताजनक बाब आहे. विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रमाणात नाही तर प्रचंड प्रमाणात बॅकफूटवर गेलेली आहे. नोटबंदीवरही नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाहीत. विधानसभा निवडणूकीनंतर दादा बेलापुर मतदारसंघ सातत्याने पिंजून काढतील, प्रभागाप्रभागात लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील अशी अटकळ दादांच्या भोळ्या भाबड्या समर्थकांकडून बांधण्यात आली होती. आज विधानसभा निवडणूका अडीच वर्षावर आल्या असतानाही लोकनेते गणेश नाईकांच्या घडामोडींना पाहिजे त्या प्रमाणात वेग आलेला नाही. मंदा म्हात्रेंच्या माध्यमातून भाजपाची आक्रमकता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या छावणीत असलेली शांतता नाईक समर्थकांना अस्वस्थ करत आहे.