नवी मुंबई शहर गेल्या काही वर्षापासून अनधिकृत बांधकामांमुळे तसेच अतिक्रमणामुळे नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी, न्यायालय, राज्य सरकार आदी सर्वच ठिकाणी चर्चेचा विषय बनले आहे. अर्थात या अनधिकृत बांधकामांना आणि अतिक्रमणांना सर्वस्वी महापालिका प्रशासन व सिडकोच जबाबदार आहे. सिडकोने स्थानिक ग्रामस्थांना साडे बारा टक्केचे भुखंड देण्यास विलंब केला आणि गावठाण विस्तार योजना राबविण्यास आजतागायत चालढकलच केली आहे. साडे बारा टक्केचे भुखंड देण्यास विलंब केल्याने ग्रामस्थांना गरजेपोटी घरे बांधण्याशिवाय पर्यायच नव्हता. शहर विकसिकरणासाठी संपूर्ण शहरच भूसंपादन करण्याची महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एकमेव घटना आहे. सध्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांना नोटीसा पाठविण्याचा धडाका लावला आहे. पालिका प्रशासनाने नोटीसा पाठविताना पिढ्या न पिढ्या जुन्या असलेल्या ग्रामस्थांच्या मंदिरांनाही पालिका प्रशासनाने नोटीसा पाठविल्याने नवी मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे. मुळातच ज्या वेळी शहरामध्ये सिडको, महापालिकाही आली नव्हती, आताच्या वयोवृध्द ग्रामस्थांचा जन्मही झाला नव्हता. त्यांच्या अगोदर कित्येक दशके, शतके अगोदर ग्रामस्थांची दैवते आहेत, मंदिरे आहेत. आता याच मंदिरांना अनधिकृत ठरवून त्यांना महापालिका प्रशासनानेे नोटीसा पाठविल्या आहेत. आधी आमची घरे तोडून बेघर केले, आता आमच्या देवाच्या मूळावरही उठले असा संताप आता गावागावातील ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. एकवेळ पोटाला अन्न नसले तर माणूस काही काळ उपाशी राहू शकतो, पण देवाची बाब ही भावनिक, श्रध्देची असल्याने याची किंमत फार मोठी मोजावी लागते. जमिनीवरची मंदिरे तर सोडा, पण खाडीअंर्तगत भागात असलेली पिढ्या न पिढ्या जुनी मंदिरेही अनधिकृत ठरविण्याचा उद्योग पालिका प्रशासनाने केला आहे.
नवी मुंबई शहराच्या विकसिकरणाची प्रक्रिया ही खर्या अर्थाने शासकीय गरजेतून झालेली आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा मुंबईतच विस्फोट होवू नये यासाठी राज्य सरकारने मुंबईलगतच्याच नवी मुंबईमध्ये या लोकसंख्येचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना नवी मुंबईतील भूसंपादन व नवी मुंबई विकसिकरणाची जबाबदारी राज्य सरकारने पूर्णपणे सिडकोवर सोपविली. सिडकोने भूसंपादन करण्यापूर्वी येथील स्थानिक आगरी-कोळी समुदाय हा भातशेतीवर व खाडीमध्ये करण्यात येणार्या मासेमारीवर आपली उपजिविका भागवित होता. तथापि सिडकोने केलेेल्या भुसंपादनामुळे स्थानिकांच्या भातशेतीचा विषय कायमचाच निकाली निघाला. खाडीमध्ये गटारांचे, नाल्याचे, शौचालयाचे, कंपन्या-कारखान्यांचे रासायनिक व दूषित पाणी, सांडपाणी येवू लागल्याने खाडीतील मासेमारी कमी झाली. त्यातच खाडीपुलाची निर्मिती, पामबीच मार्गाची निर्मिती यामुळे पाण्यात हादरे बसून खाडीतील माशांचे अस्तित्व संपुष्ठात येवू लागले आहे.
पामबीच मार्गापासून खाडीअंतर्गत भागात फार दूरवर येथील स्थानिक ग्रामस्थांच्या दैवतांची मंदिरे आहेत. त्या मंदिरानांही पालिकेने नोटीसा पाठविल्या आहेत. खाडीत मासेमारी करावयास जाताना खाडीत असणार्या देवांमुळेच आपले संरक्षण होत असल्याची या भोळ्या भाबड्या ग्रामस्थांची भावना आहे. याच देवापैकी खाडीमध्ये असणांरा एक बामणदेव. गेल्या अनेक वर्षापासून, पिढ्या न् पिढ्या सारसोळेचे ग्रामस्थ या बामणदेवाची पूजा अर्चा करतात. बामणदेव हा शिवशंकराचाच अवतार असल्याने महाशिवरात्रीला खाडीमध्ये सारसोळेचे ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने बामणदेवाचा भंडारा साजरा करत असतात. या भंडार्यामध्ये नवी मुंबई, पनवेल, ठाणे, उरणसह मुंबईतूनही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. नवी मुंबईतील आमदार, नगरसेवक, महापालिका व सिडकोचे अधिकारी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारीदेखील भंडार्यामध्ये महाप्रसादाला आर्वजून उपस्थित राहतात. पामबीच मार्गापासून दोन-सव्वा दोन किलोमीटर भागात हे खाडीअंर्तगत बामनदेवाचे मंदिर आहे. हा देव उन्हात असल्याने या देवाच्या डोक्यावर साधे छप्परही नाही. कोठेही या मंदिराचे अतिक्रमण नाही. त्याच मंदिराला महापालिकेने अनधिकृत ठरवून नोटीस पाठविली आहे. या बामनदेवाकडे जाणारा मार्ग आजही कच्चा, खाचखळग्याचा आहे. हा मार्ग व्यवस्थित व्हावा, डागडूजी व्हावा यासाठी गावातील मनोज मेहेर या युवकानेे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून महापालिका, सिडको, राज्य शासन, पालकमंत्र्यांचा जनता दरबार सर्वत्रच हजारोच्या संख्येने निवेदनांचा पाऊस पाडलेेला आहे. मंत्रालयदरबारी तसेच पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात चपला झिजविलेल्या आहेत. हा मार्ग आजतागायत कच्चाच आहे, पण आश्वासने मात्र प्रशासनाकडून व राजकारण्यांकडून मोठ्या प्रमाणावर मिळालेली आहे. या मार्गावर पूर्वी सारसोळेच्या ग्रामस्थांची मिठागरेही होती. दररोज या मार्गावर तीन ते साडे तीन हजार लोकांचा राबता होता. मिठागरे बंद झाल्यावर या मार्गावरील वर्दळ कमी झाली. आता फक्त खाडीमध्ये मासेमारी करायला जाणार्यांची व बामणदेवांच्या दर्शनाला जाणार्यांचीच वर्दळ आहे. खाडीअंतर्गत सर्वच रस्त्यांचे महापालिका प्रशासनाने डांबरीकरण केले आहे. फक्त बामणदेवाकडे जाणारा मार्गच कच्चा आहे. या देवाची पिढ्या न् पिढ्या पूजा होत असल्याने आमचा देव व आमचे मंदिर पालिकेने कोणत्या निकषावर अनधिकृत ठरविले याचा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त केेला जात आहे. सरकारी जमिनीवर वसलेल्या 2000 पूर्वीच्या अनधिकृत झोपड्या सरकार अधिकृत करू लागले आहे. त्यांना सोयी-सुविधा देत आहे. मात्र या शहराच्या मूळ मालकाने, भुमीपुत्राने, आगरी-कोळी समाजाने 2000 पूर्वी गरजेपोटी केलेली बांधकामे आता अनधिकृत ठरू लागली आहेत. त्यांचा समावेश अतिक्रमणामध्ये होवू लागला आहे. स्थानिक भूमीपुत्रांना बेघर केले जात आहे. आता तर त्यांच्या पिढ्या न् पिढ्या जुन्या मंदिरांनाही अनधिकृत ठरविण्याचे धाडस महापालिका प्रशासन दाखवू लागले आहे. खाडीअंर्तगत भागात ना पाणी, ना वीज, ना पदपथ, ना रस्ता पालिका प्रशासनाने पुरविले. ना तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम नाही, ना सुविधा नाही. तरीही उन, वारा, पावसामध्ये सारसोळेचे ग्रामस्थ बामनदेवाच्या दर्शनाला जात असतात. महापालिकेने अतिक्रमणांवर हातोडा अवश्य मारावा. पण वर्षानुवर्षे, पिढ्या न पिढ्या जुन्या असणार्या बामनदेवाच्या मंदिराला अनधिकृत ठरविताना शतदा विचार करावा. उपग्रह छायाचित्रांचाही वेळ पडल्यास आधार घ्यावा. जुनाट मंदिरांना व भावनिक श्रध्देशी खेळण्याचे धाडस महापालिका प्रशासनाने दाखवू नये असा संतप्त इशारा ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.
– संदिप खांडगेपाटील़
– वृत्तसंपादक
– 8082097775
– साभार : दै. जनशक्ती
– संदीप खांडगेपाटील यांचा दै. जनशक्तीमध्ये हा लेख 9 जानेवारी रोजी प्रकाशित झालेला असून नवी मुंबई लाईव्हच्या वाचकांसाठी आम्ही प्रसिध्द करत आहोत.१९९२ पासून संदीप खांडगेपाटील पत्रकारितेमध्ये कार्यरत असून कॉलेज वार्ताहर ते संपादक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. राजकीय क्षेत्रातील लिखाणांवर त्यांचा प्रभाव असून सध्या ते दै. जनशक्तीमध्ये वृत्तसंपादक म्हणून काम करत आहेत.