नवी मुंबई / अनंतकुमार गवई :
नागरिकांचे प्रश्न त्यांच्याकडूनच समजून घेऊन त्याव्दारे शहर विकासाला गती यावी यादृष्टीने सुरु केलेल्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून नागरिकांनी मांडलेल्या समस्यांपैकी धोरणात्मक बाबी सोडल्या तर 90 टक्केहून अधिक प्रश्न मार्गी लागल्याचे सांगत महापालिका आयु्क्त श्री. तुकाराम मुंढे यांनी महापालिका नागरी सुविधा पुरवण्याची आपली जबाबदारी पार पाडत असताना नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्वच्छतेच्या बाबत प्रत्येकजण वैयक्तिक पातळीवर काळजी घेतो पण सामाजिक पातळीवर सर्वसाधारणपणे दुर्लक्षच केले जाते. त्यामुळे शहर स्वच्छतेला बाधा पोहचते ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्याकडून कमीत कमी कचरा निर्माण होईल व तो योग्य ठिकाणीच टाकला जाईल याची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. कचरा हा निर्माण होतो त्याच ठिकाणी ओला व सुका असा वेगवेगळा ठेवला तर कच-याचा निम्मा प्रश्न सुटतो असे सांगत आयुक्तांनी समाज स्वास्थ्य जपण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय लावून घ्यावी असे आवाहन केले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशातील 500 शहरांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 सुरु झाले असून नागरिकांनी 1969 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून स्वच्छतेबाबतचे आपले मत दाखल करावे असे त्यांनी सांगितले. या टोल फ्री क्रमांकावर फोन लावल्यानंतर फोन आपोआप कट होईल व लगेचच तुम्हाला फोन येईल. यामध्ये हिंदी / इंग्रजी भाषा निवडण्याची संधी असेल. त्यानंतर शहराचा पिनकोड नंबर टाईप करण्यास सांगितले जाईल. पिनकोड नंबर टाकल्यानंतर स्वच्छतेबाबतचे 6 प्रश्न विचारण्यात येतील. स्वच्छतेबाबत शहरात वर्षभरात झालेल्या सुधारणांबाबतच्या या प्रश्नांचे योग्य उत्तर देऊन आपल्या नवी मुंबई शहराला स्वच्छतेमध्ये देशात नंबर 1 करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत: फोन लावून या स्वच्छता सर्व्हेक्षणात कर्तव्य भावनेने सहभागी व्हावे व आपले कुटुंबिय, मित्र परिवार, परिचित व्यक्ती यांनाही या स्वच्छता सर्व्हेक्षणात 1969 हा टोल फ्री नंबर लावून सहभागी होण्यास सांगावे असे आवाहन त्यांनी केले. अशाप्रकारे स्वच्छतेबाबतचे अभिप्राय –
https://docs.google.com/forms/ d/e/ 1FALpQLSeRowViM9eDhtZDoNtpVt4U U1ljx8Lo3DO3BpDd_wbplCYTvg/ viewform या लिंकवरुनही नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे अशी माहिती त्यांनी दिली व स्वच्छता सर्व्हेक्षणात स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे सांगितले.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाला व मानवी आरोग्याला पोहचणारा दूरगामी धोका लक्षात घेऊन प्लास्टिकमुक्त नवी मुंबई ही संकल्पना नजरेसमोर ठेवून 08 जानेवारीपासून “प्लास्टिक प्रतिबंधक अभियान” हाती घेतले असून संपूर्ण महापालिका क्षेत्रात प्रत्येक विभागात ठिकाणे निश्चित करून लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालये, महिला बचतगट, ज्येष्ठ नागरिक संघ,उद्योजक, व्यापारी, पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या एकत्रित सहयोगाने ही मोहीम राबविली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली.
उद्या रविवारी 08 जानेवारीला सकाळी 08.00 वा. सेक्टर 19 नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटन केंद्राठिकाणी सकाळ माध्यम समूह आणि डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अलिबाग यांच्या सहयोगाने या “प्लास्टिक प्रतिबंधक अभियाना”चा मुख्य कार्यक्रम होत असून स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड अँबेसेडर सुप्रसिध्द गायक, संगीतकार श्री. शंकर महादेवन आणि सुप्रसिध्द अभिनेत्री जुही चावला यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती असणार आहे. अशाच प्रकारे विभागाविभागात कार्यक्रम राबविले जात असून त्याची यादी महापालिका वेबसाईट www.nmmc.gov.in यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी आपापल्या क्षेत्रातील निश्चित केलेल्या ठिकाणी उपस्थित राहून या प्लास्टिक प्रतिबंधात्मक अभियानात सहभागी व्हावे व यापुढील काळात दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेने कर भरणा करण्यासाठी तसेच स्मार्ट फोनच्या एका टचवर तक्रारी /सूचना दाखल करण्यासाठी “nmmc e-connect” हे मोबाईल ॲप सुरु केले असून त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असेही त्यांनी सांगितले. लवकरच या ॲपमध्ये एन.एम.एम.टी.चेही ॲप कनेक्ट होणार असून ज्याव्दारे नागरिकांना बस किती वाजता येणार आहे? कुठे आहे? अशी प्रवासाच्या नियोजनाच्या दृष्टीने अत्यावष्यक माहिती उपलब्ध होईल.
पार्किंगच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर पार्क न करता आपल्या सोसायटीच्या आवारात, योग्य जागेतच पार्किंग करावीत, जेणेकरून रस्ते चालण्यासाठी,वाहतुकीसाठी मोकळे राहतील असे सांगत आयुक्तांनी यापुढील काळात वॉकॅबिलिटी वाढविण्यावर विशेष लक्ष देणार असल्याची माहिती दिली. नवी मुंबई हे आपले शहर देशातील अग्रगण्य शहर बनविण्यासाठी नागरिकांकडून सामाजिक जबाबदारीचे भान राखत छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी नागरिकांकडून सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी अनेकांनी हस्तांदोलन करत एक चांगला उपक्रम सुरु केल्याबद्दल आयुक्तांचे आभार मानले. एका तरूणाने तर “आपही शहर की उम्मीद हो”अशा शेरव्दारे नागरिकांच्या आयुक्तांविषयीच्या भावना अभिव्यक्त केल्या.