राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. राजकारणात कोणाचीही मक्तेदारी फार काळ टिकून राहात नाही. अर्थात याला काही अपवाद असतातच. आपल्या विकासकामांच्या जोरांवर आणि जनसंपर्काच्या बळावर अनेकजण टिकून राहतात, ते ते मतदारसंघ आपले बालेकिल्ले बनवितात. अर्थात त्यासाठी त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागते. कोणीही सहजासहजी मतदारांच्या गळ्यातले ताईत बनत नाही. त्यासाठी गर्वाचा स्पर्श आपणास होवू द्यायचा नसतो. जमिनीवर पाय ठेवूनच वावरायचे असते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणूकीत खर्या अर्थांने राजकीय झंझावात आला. अर्थात हा राजकीय झंझावात मोदी लाटेमुळेच निर्माण झाला होता. कधी नव्हे ते भाजपाचे 122 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले. अनेक रथी-महारथींना घरी बसावे लागले. परंतु ज्यांनी विकासकामे केली, तळागाळाशी जनसंपर्क कायम ठेवला असे हाताच्या बोटावर मोजता येतील असे आमदार मोदी लाटेवरही मात करून विधानसभेत पोहोचले. अशाच आमदारांच्या मांदियाळीमध्ये अग्रक्रमाने नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातील आमदार संदीप नाईक यांचे नाव आर्वजून घ्यावे लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात आजही आमदार संदीप नाईकांचा उल्लेख हा नवी मुंबईचे ओबामा या नावानेच आदरपूर्वक केला जातो.
एप्रिल 2014मध्ये लोकसभा निवडणूका झाल्या. मोदी लाटेमुळे नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल 47 हजारांनी पिछाडीवर पडली. नवी मुंबई परिसर राजकारणात तसा लोकनेते गणेश नाईकांचा पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु मोदी लाटेमध्ये नमो नमोचा जयजयकार झाला आणि होत्याचे नव्हते होवून गेले. कमळाच्या मदतीने अनेक जण तरले तर रथी-महारथींना कमळाच्या विरोधामुळे पराभूत व्हावे लागले. ऐरोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस 25 हजाराने तर बेलापुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूकीत 22 हजाराने पिछाडीवर होती. लोकसभेपाठोपाठ अवघ्या सहा महिन्यानेच विधासनभा निवडणूका होणार होत्या. नवी मुंबईमध्ये देशातल्या सर्वच भागातील नागरिक रोजगार, व्यवसायासाठी स्थिरावले असल्याने या शहराला मिनी भारताचेच स्वरूप प्राप्त झाल होते. परप्रातिंय हा एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मतदार आता भाजपाच्या छावणीत विसावल्याने विधानसभा निवडणूकीत पुढे काय होणार याची चिंता नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांनाही होती. लोकसभा निवडणूकीत 47 हजाराची पिछाडी आणि परप्रातिंयानी कमळाला दिलेली पसंती यामुळे चिंतेचे सावट चेहर्यावर घेवूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी वावरत होते. लोकनेते गणेश नाईकांना खाजगीत दादा या नावाने तर संदीप नाईकांना भाई याच नावाने संबोधले जाते. कार्यकर्ते आणि पदाधिकारी तर खासगीमध्ये एक वेळ दादा कसेही सीट काढतील पण भाईचे अवघड आहे अशीही चर्चा करत होते. लोकसभा निवडणूकीच्या रूपातून वादळ येवून गेले आणि विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून महावादळ येणार होते. या महावादळाच्या शक्येतेनेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या व कार्यकर्त्यांच्या अंगावर काटा उभा राहीला होता. पण या महावादळाचा सामना करण्यासाठी संदीप नाईकरूपी चक्रीवादळ लोकसभा निवडणूकीनंतर सुसज्ज झाले होते. लोकसभा निवडणूकीतील 25 हजाराची पिछाडी भरून काढावयाची होती. कमळाबाईच्या आहारी गेलेल्या परप्रातिंयाची समजूत काढायाची होती. आपण केलेली विकासकामे तळागाळातील मतदारांना पटवून द्यायची होती. त्यातच भाजपाची मार्केटींग देशाच्या, महाराष्ट्राच्याच नाही तर अगदी नवी मुंबईच्याही कानाकोपर्यात सुरू होती. या मार्केटींगलाही तोंड द्यायचे होते. पुन्हा एकवार पानिपतची लढाई ऑक्टोबर 2014 मध्ये होणार होती. ऐरोलीचा गढ राखण्याची रणनीती ओबामाच्या डोक्यात सुरू होती. मेंदूमध्ये सतत विचारांचे थैमान हिंदोळे घेत होते. लढाई अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची होती. अवघा 6 महिन्याचाच कालावधी होता. आपल्याही छावणीतील कोण जाईल आणि कोण राहील याचीही काही शाश्वती नव्हती. संदीप नाईक कसलेल्या मुत्सद्दी राजकारण्यांसम शांत होते. चेहर्यावरून त्यांच्या मनामध्ये सुरू असलेल्या विचारांचा अंदाजही येत नव्हता. आम्ही ओबामाचे निकटवर्तीय असल्याने खासगीत एकदा आमच्या ओबामांना विचारण्यांचे धाडस दाखविले. कारण ते धाडस फक्त आम्हीच दाखवू शकतो. आमचे नाते विश्वासाचे व श्वासाचे असल्याने मनामध्ये काहीही शंका असल्यास ओबामांना अगदी मध्यरात्रीही उठविण्याचे धाडस आम्ही आजही दाखवू शकतो. ओबामांचा आमच्यावर असलेला विश्वास आणि आमचे ओबामावर असलेेले बेफाम प्रेम यामुळेच ते शक्य होते. ओबामा निर्धाराने व आत्मविश्वासाने म्हटले, मी ऐरोली विधानसभा मतदारसंघ जिंकणार आणि निसटत्या मतांनी नाही तर किमान 8 ते 12 हजार मतांनी जिंकणार. मतदारांवर माझा विश्वास आहे, मला नाही तर मी केलेल्या विकासकामांवर माझ्या जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे कोणीही चिंताग्रस्त होवू नका. कामाला लागा. बोलताना ओबामाच्या चेहर्यावर एक वेगळेच तेज होते. बोलण्यात आत्मविश्वास होता. डोळ्यामध्ये चकाकी होती.
ओबामाचा आत्मविश्वास आणि ओबामांच्या रणनीतीवर आमचा असलेला विश्वास यामुळे ऐरोलीच्या गढाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या छावणीत उत्साह संचारला. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ओबामांनी मतदारसंघ पिंजून काढला. प्रचार अभियानादरम्यान अनेक रात्री ओबामांनी जागून काढल्या. पालिका निवडणूकीच्या धर्तीवर विधानसभा निवडणूकीत संदीप नाईकांनी घरटी जनसंपर्क केला. कानकोपर्यात सुसंवाद साधला. संदीप नाईकांनी आमदारकीचा उमेदवार म्हणून नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जोमाने प्रचार केला. मतदान झाले आणि मतमोजणीचा उद्याचा दिवस होता. पुन्हा एकदा धाकधुकी होती. मतमोजणी अवघ्या काही तासावर आली होती. राष्ट्रवादीच्या छावणीत दादा आणि भाई या मतदारसंघांमध्ये दादा कसेही जिंकतील, पण भाईबाबत परत दबक्या आवाजात चर्चा होती. ओबामांना पुन्हा त्रास दिला. त्याहीवेळी ओबामा निर्धाराने म्हणाले की, कोणाबरोबरही कितीचीही पैंजा लावा. ऐरोलीतून मी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी आताच झाला आहे. आठ ते दहा हजाराने ऐरोलीचा गढ राष्ट्रवादी काँग्रेसने राखला आहे. मतमोजणीच्या अगोदरच ओबामाने सांगितलेले हे शब्द कमालीचा आत्मविश्वास दाखवित होते. मतमोजणी झाली, निकाल जाहिर झाले. राष्ट्रवादीचा ऐरोलीचा गढ आला पण बेलापुरचा सिंह अवघ्या 1200 मतांना धारातिर्थी पडला. दादांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.
भाजपाच्या छावणीत ऐरोलीच्या विजयाबाबत गांभीर्याने विचारमंथनही झाले. लोकनेते गणेश नाईकांचा पराभव आपण करू शकलो, पण संदीप नाईकांना पराभूत का करता आले नाही याचा शोधही घेण्याचा प्रयत्न झाल्याचे भाजपाच्या छावणीतून सांगण्यात येत आहे. निवडणूकीअगोदर पाच महिने पूर्वी आपण जिंकणारच, अगदी मतदान संपल्यावर मतमोजणी होण्याच्या अगोदर काही तासापूर्वी आपण 8 ते 10 हजारांनी जिंकणार हा ओबामांनी दाखविलेला आत्मविश्वास हा ओबामाच्या चेहर्यावरील शांतता आणि मनामध्ये सुरू असलेले विचारांचे वादळ याचा परिपाक निवडणूक निकालामध्ये दिसून आले.
संदीप नाईक हे विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी असताना, नगरसेवक असताना, सलग तीन वर्षे महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती असताना, पाच वर्षे आमदार असताना त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही बदल झाला नाही. कालही त्यांचे पाय जमिनीवर होते आणि आजही आहेत. जनसंपर्क कार्यालयात हजेरी आणि शेवटच्या माणसाची चौकशी केल्याशिवाय जनसंपर्क कार्यालय न सोडणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे ही कार्यप्रणाली आजही कायम आहे. स्थायी समिती सभापती असताना त्यांनी सभापती आपल्या अंगणात हे अभियान राबविताना प्रभागाप्रभागात पायपीट केली. विविध उपक्रमातून तळागाळातील जनतेशी सुसंवाद साधला. संदीप नाईकांच्या स्वभाव गुणांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते स्वत: रणागंणात पुढे उभे राहून लढाई करतात. संदीप नाईकांचे पाय जमिनीवर असल्याने त्यांना भेटण्यासाठी आजही कोणा मध्यस्थाची गरज लागत नाही. हा माणूस आजही कोणाला खोटे आश्वासन देत नाही. काम होणार असेल तरच हो म्हणतो. नसेल होणार तरह हात जोडून स्पष्टपणे नाही म्हणून सांगतो. स्थायी समिती सभापती असताना मुसळधार पाऊसामुळे वाशी सेक्टर 17 मधील नाले तुंबलेले असताना नाल्यामध्ये मुसधार पाऊसामध्येे गळ्याइतक्या पाण्यात उतरून हाताने कचरा साफ करणारे संदीप नाईक हे एकमेव राजकारणी आहेत. खोटे बोलून माणसाला झुलवत ठेवणे संदीप नाईकांच्या स्वभावात नाही. त्यामुळे एकदा नाही तर हजारदा मोदी लाट येवू द्या, जमिनीवर पाय ठेवून वावरणार्या व तळागाळातील जनतेच्या कल्याणसाठी जीवन समर्पित करणार्या संदीप नाईकांना कोणीही पराभूत करू शकत नाही असे ओमाबाच्या कडवट समर्थकांकडून अभिमानाने सांगण्यात येत आहे.
– श्रीकांत पिंगळे