नवी मुंबई : शासकीय गरजेतुन विकसित झालेल्या व अन्य शहराच्या तुलनेत नावारूपाला आलेल्या नवी मुंबईमध्ये अनेक गृहनिर्माण सोसायट्या आज या शहरामध्ये आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यातील नेरूळ सेक्टर 28मध्ये असणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी व्यापार्यांची श्रीगणेश सोसायटी. अर्थात ही गृहनिर्माण सोसायटी सहजासहजी निर्माण झालेली नाही. भाजी मार्केटमधील मातब्बर प्रस्थ, बाजार समितीचे माजी संचालक व नवी मुंबईचे माजी उपमहापौेर, नगरसेवक अशोक गावडे यांच्या अथक परिश्रमातून ही सोसायटी आकाराला आली व नावारूपाला आली.
सोसायटीकरिता व्यापार्यांना एकत्रित करणे, त्यांची गृहनिर्माण सोसायटीची स्थापना करणे, सिडको दरबारी पाठपुरावा करून भुखंड मिळविणे, इमारती बांधणे हे अग्निदिव्य केवळ अशोक गावडे यांच्या परिश्रमामुळेच शक्य झाले आहे. अशोक गावडे आजही श्रीगणेश सोसायटीला आपले कुटूंबच मानतात. घरच्यांपेक्षाही अधिक प्रेम आपल्या उभ्या हयातीत अशोक गावडेंनी आपल्या श्रीगणेश सोसायटीवर केलेले आहे. या सोसायटीच्या स्थापनेपासूनच्या आजतागायतच्या वाटचालीत अशोक गावडे यांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळेच अशोक गावडे आणि श्रीगणेश सोसायटी यांचा एक आगळावेगळा ॠणानुबंध आजही कायम आहे.
घाऊक बाजारपेठेतील व्यापारी आणि कर्मचार्यांकरिता शासनाकडून अत्यल्प दरात घरे मिळवून देण्यासाठी राखीव भूखंड देण्यात आले होते. त्यापैकी नेरुळ येथील श्री गणेश सहकारी संस्था एक आहे.
नवी मुंबईत सर्व घाऊक बाजारपेठा स्थलांतरित झाल्या होत्या. त्यासह स्थलांतरित होणार्या व्यापारी आणि कर्मचारी वर्गासाठी शासनाने सिडकोच्या मदतीने घाऊक व्यापारी, कर्मचार्यांसाठी अत्यल्प दरात भूखंड वाटप केले आहेत. अशा पैकी दादर भाजी मार्केटमधील व्यापार्यांना नेरुळ सेक्टर-28 येथे सात एकर जागेत गृहनिर्माण संस्था उभारण्यात आली. या संकुलात वास्तव्यास असलेले रहिवासी हे दादर भाजीपाला मार्केटमधील स्थलांतरित आहेत. गृहनिर्माण संस्था उभारतानाच सर्वच जण भाजीपाला बाजारपेठेतील असतील असा नियम होता. आजतागायत तो नियम टिकून ठेवला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी सांगितले.
एकूण 554 कुटुंबातील सदस्यांची त्या वेळी गरीब परिस्थिती आणि कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आणि आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांच्याकडून एक हजार रुपये इतक्या रकमेवर सदस्यत्व देण्यात आले. अभुदय बँकेमार्फत त्यांना 1996 साली घरे मिळवून दिली. या संकुलात सर्वधर्मीय आणि भाजीपाला घटकातील लोकांना सामावून घेऊन भारतीय संस्कार आणि संस्कृतीची जोपासना केली जात आहे. संकुलात सर्व जाती-जमातीचे सण नवरात्री, गणेशोत्सव, दसर्याला सोने सारे मोठ्या उत्साहाने लुटून आनंदात भर टाकतात.
रहिवासी वर्गणीरूपाने गणेश मंदिरातील धार्मिक कार्याला आर्थिक मदत करतात. दानपेटीत हे दान टाकण्याची प्रथा आहे. यात कोणालाही सक्ती केली जात नाही. दानपेटीत सभासद वर्गणी जमा करीत असतात. गणेश मंदिराच्या परिसरात रोज भजने रंगतात. भजनी मंडळी हा उपक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडत असतात.
संकुलातील रहिवासी व्यक्तिगत आणि जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून पनवेल येथील आनंदवनात अन्नदान करीत असतात. श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात क्रिकेट, जलतरण आणि कुस्तीसारख्या स्पर्धा घेऊन राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करण्यात आले आहेत. कुस्तीसारख्या नामशेष होणार्या खेळालाही येथे प्रोत्साहन दिले जात आहे. या कुस्तीच्या माध्यमातून अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर गाजले आहेत. अशा तर्हेने एक भाजीपाला व्यवसायातील घटकांचे अस्तित्व टिकवून ठेवून त्यांना पुढे नेण्याचा वसा येथील नागरिकांनी घेतला आहे.
**
संकुल बाग
संकुलात पाच उद्याने आहेत. संकुलाभोवती वेगवेगळ्या प्रकारची 430 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात आंबा, नारळ, लिंब, अशोका अशा प्रकारची फुले आणि फळझाडे लावण्यात आली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका आणि वृक्षारोपण प्राधिकरण यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले आहेत; मात्र सोसायटीत फक्त वृक्षलागवडीपुरती मर्यादित न ठेवता ठिकठिकाणी बसण्यासाठी बाके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे संकुलाच्या आवारात फिरताना एकीकडे झाडे, खेळणारी मुले आणि ठिकठिकाणी आसनव्यवस्था दिसत आहे.
** सौरऊर्जेचा ध्यास
प्रत्येक मजल्यावर सौरऊर्जेवर चालणारे दिवे आहेत. याशिवाय संकुलाच्या आवारातही असे दिवे लावण्यात येणार आहेत, कंपोस्ट खतनिर्मितीचा संकुल रहिवाशांचा मानस आहे. याच वेळी पर्जन्यजल संधारण यंत्रणा बसविण्याचा निर्णयही रहिवाशांनी घेतला आहे.