२६/११च्या घटनेनंतर देशाच्या विशेषत: मुंबईच्या सागरी सुरक्षेचे धिंडवडे जगभरात निघाले. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत विनासायास प्रवेश करून भारतामध्ये सागरी मार्गाने सहजगत्या प्रवेश मिळतो हे जगाला दाखवून दिले. २६/११च्या घटनेनंतर तरी सागरी सुरक्षेचे महत्व सरकारच्या लक्षात येईल आणि सागरी सुरक्षेेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे सर्वाना वाटत होते. पण तसे काहीही घडलेले नाही. नवी मुंबई कार्यक्षेत्राचा विचार करता, नवी मुंबईच्या एका बाजूला पूर्णपणे खाडी आहे. खाडीमध्ये नवी मुंबईतील आगरी-कोळी समाज मासेमारी करून आपली उपजिविका भागवित आहे. तथापि या खाडीकिनार्यावर आणि खाडीअर्ंतगत भागामध्ये कोठेही माफक तर सोडा पण किमान सुरक्षा व्यवस्था कोठेही पहावयास मिळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर नवी मुंबईतील खाडी किनार्यांना सुरक्षेचे कवच न मिळाल्यास येत्या काळात कोणतीही महाभयावह दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पामबीच मार्गालगतच जाताना आपणास वाशी ते एनआरआय दरम्यान आपणास खाडी किनारा पहावयास मिळतो. कोपरखैराणे, ऐरोली, दिघा, विटावा आदी ठिकाणीही खाडीकिनारा आहे. नवी मुंबई शहर हे शासकीय गरजेतून विकसित करण्यात आले आहे. भातशेती व खाडीमध्ये करावी लागणारी मासेमारी हेच येथील आगरी-कोळी समाजाच्या उपजिविकेची दोन साधने होती. भूसंपादनामुळे भातशेती निकाली निघाली. आता खाडीतील मासेमारीशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. खाडीमध्ये जाणार्या जेटीवर गेल्या काही महिन्यापासून सुरक्षा रक्षक दिसू लागला आहे. तथापि या सुरक्षा रक्षकांसमोरच जेटीवर व जेटीसभोवतालच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी खुलेआमपणे दारूच्या पार्ट्या होत असतानाही सुरक्षा रक्षक केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. खाडीमध्ये जाताना आवश्यक असणारी मासेमारीची जाळी व अन्य साहीत्य मासेमारी करणारे आगरी-कोळी लोक जेटीवरच ठेवून जात असतात. खाडीतून पकडून आणलेले मासे व मासेमारीचे साहीत्य दोन्ही एकाच वेळी घरी घेवून जाणे शक्य नसल्याने ते मासेमारीसाठी लागणारे साहीत्य जेटीवरच ठेवून जात असतात. वर्षानुवर्षे त्यांचा हाच दिनक्रम आहे. सारसोळेच्या जेटीवर कोळी लोकांनी ठेवलेली जाळी चार वर्षापूर्वी अंधारात अज्ञात समाजकंठकांनी जाळली. पामबीच मार्गावरून संबंधित समाजकंठक आले, १४ जाळी जाळून निघून गेले. पामबीच मार्गावर असणारे सीसीटीव्हीमध्ये काहीही उपलब्ध न झाल्याने सीसीटीव्हीच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सारसोळेच्या मच्छिमारांचे ४ लाख ९० हजार रूपयांचे जाळी जाळल्यामुळे नुकसान झाले आहे. नेरूळ पोलीस ठाण्यापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपर्यत सारसोळेच्या ग्रामस्थांनी याप्रकरणी पाठपुरावा केला. तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारातही सारसोळेच्या ग्रामस्थांनी चपला झिजविल्या. तथापि जाळी जाळणारे आरोपी आजही भेटलेले नाही. या घटनेचे गांभीर्य आजतागायत नेरूळ पोलिसांना समजलेले नाही. विटावा ते दिवाळा पर्यतच्या खाडीकिनार्याचा राज्य सरकारने गांभीर्याने सर्व्हे करणे आवश्यक आहे. खाडी परिसरात जाण्याकरिता विविध मार्ग आहेत. खाडीअर्ंतगत भागात नाल्यातील पाणी येण्या-जाण्याच्या मार्गावर ज्या ज्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने ढापे बसविलेले आहेत, त्या त्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता महापालिका प्रशासनाने खाडीअर्ंतगत भागात डांबरी रस्ते बनविले आहेत. पावसाळ्यात भरती-ओहोटीच्या काळात खाडीअर्ंतगत भागात असलेले ढापे महत्वाची भूमिका बजावत असतात. खाडीअर्ंतगत भागात दारूच्या पार्ट्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. खाडीअर्ंतगत भागामध्ये मृतदेह सापडतात. कधी आत्महत्या, कधी खून, कधी जळीत कांड अशा विविध घटना घडतच असतात. खाडीअर्ंतगत भागात झालेल्या आत्महत्या व खूनप्रकरणे ही नवी मुंबईतील जेमतेम दोन ते तीन टक्केच असून बाकी सर्व प्रकरणे मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, ठाणे, पनवेल-उरण भागातीलच असतात. वाशी रेल्वे स्थानकामध्ये चार नंबर स्थानकांवरून थेट वाशी खाडी अर्ंतगत परिसरामध्ये प्रवेश करता येतो. पामबीच मार्गावरून जेटीचा अपवाद वगळता पाच ते सहा ठिकाणाहून प्रवेश करता येतो. युवक आपल्या मैत्रिणींना घेवून खाडीअर्ंतगत भागात दुचाकी घेवून मोठ्या प्रमाणावर येत असतात. बारबालांना फिरवण्यासाठीही खाडीअर्ंतगत भागात काही घटक येत असतात. इतरत्र पत्ते खेळले तर पोलिसांची धाड पडण्याची शक्यता असते. मात्र खाडीअर्ंतगत भागात गेल्यास पोलिसांची भीती नाही. मस्त वारा आणि ओल्या पार्टीचा सहवास यामुळे पत्ते कुटणारेदेखील खाडीअर्ंतगत भागात असतात.
नवी मुंबईतून जेएनपीटी, बीएआरसी, मुंबई, ठाणे व अन्य भागात सागरी मार्गाने लवकरात लवकर जाणे सहज शक्य आहे. दहशतवादी घटक आपले काम पूर्ण करून नवी मुंबईत परत येवून यशस्वीपणे पलायन करू शकतील. नवी मुंबईतील सागरी किनार्यांची असुरक्षितता भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असुरक्षित सागरी किनारे किती धोकदायक ठरू शकतात, हे २६/११च्या घटनेवरून समजले आहे. परंतु दुदैर्वाने आपण त्यापासून बोध घेण्यास तयार नाही.
दै. जनशक्तिमध्ये प्रकाशित झालेला वृत्तसंपादक संदीप खांडगेपाटील यांचा लेख नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा प्रकाशित करत आहोत. संदीप खांडगेपाटील हे १९९२ पासून पत्रकारितेमध्ये कार्यरत असून कॉलेज वार्ताहर ते संपादक अशा विविध पदांवर त्यांनी २५ वर्षामध्ये काम केले आहे. राजकीय क्षेत्रासह कामगार, शिक्षण या विषयांवर त्यांचे लिखाण विशेष प्रभावी आहे.
गणेश इंगवले – कार्यकारी संपादक
नवी मुंबई लाईव्ह.कॉम
८०८२०९७७७५