पनवेलमधील शेकडो बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टरांची नावे कळवून देखील कारवाईला उशीर
पनवेल : कुठलीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता पनवेल परिसरात शेकडो बोगस डॉक्टरांनी बनावट पदवीच्या आधारे आपली दुकाने थाटली आहेत. पनवेलच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही वर्षापासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर केव्हा कारवाई करणार असा सवाल उपस्थित झाला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या या डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा बडगा आरोग्य विभागाने उगारायला हवा अशी मागणी जनजागृती ग्राहक मंचाने केली आहे.
पनवेल परिसरात सर्रासपणे बोगस डॉक्टर व्यवसाय करत आहेत मात्र अधिकारी कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत. याबाबत मयूर तांबडे यांनी तळोजा परिसरातील बाबूलाल पटेल (देवीचा पाडा), मिहीर मोंडल (देवीचा पाडा), मनोज बिस्वास (देवीचा पाडा), राजकुमार गौड (तोंडरे), राम बिलास यादव (तोंडरे) हे बोगस डॉक्टर असल्याची तक्रार पनवेल पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी व महाराष्ट्र मेडिकल कौंसीलकडे पाठवला. या पाचही डॉक्टरकडे अहर्ता मान्यताप्राप्त नसल्याने ते महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय व्यवसाय करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर भादवि कलम ४१९, ४२०, ४६८, ४७१ नुसार व महाराष्ट्र वैद्यक व्यवसायाची अधिनियम १९६१ मधील कलम ३३, ३४ व ३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश देण्यात आलेले आहेत. हे पत्र तालुका आरोग्य अधिकारी यांना १२ जानेवारी रोजी प्राप्त झालेले आहे. मात्र १५ दिवस उलटून गेले तरी यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. यातील काही परिसर महापालिका परिसरात येत आहे तर काही ग्रामीण भाग असल्याने कारवाई करताना अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिका व ग्रामपंचायतच्या हद्दीच्या वादात सामान्य माणसाला बोगस डॉक्टरांकडे उपचार घ्यावे लागत आहे. सामान्यांना डॉक्टर म्हणजे देवाचे रूप आहे हेच वाटत असते. त्यांना बोगस डॉक्टर म्हणजे काय हे देखील माहिती नाही. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना टोलवाटोलवी करण्यात येत आहे.
कोणालाही संशय येऊ नये, याकरिता पनवेलमधील बोगस डॉक्टरांनी अन्य डॉक्टरांच्या पदवीचे फोटोग्रॉफ काढून त्याच्या नावाच्या जागी स्वत:चे नाव गोलमाल करून टाकले आहे. त्यामुळे असे बोगस डॉक्टर वर्षानुवर्षे परिसरात राहून लाखो रुपये कमावत आहेत व त्यामुळे ते कोणाच्याही नजरेत येत नाहीत, पोलिसांनी गुप्तपणे या बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे आवश्यक आहे. यात दोषी आढळणा-या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. तालुक्यातील आदिवासी वाडयापाडयांवर या डॉक्टरांचे फिरते दवाखानेही सुरू आहेत. माफक फी आणि झटपट आराम हा फंडा अनेक डॉक्टर राबवत असल्यामुळे आदिवासी, गोरगरीब रुग्णांचा कल याच डॉक्टरांकडे असतो. मात्र या डॉक्टरांकडे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी किंवा ज्ञान नसल्याने त्यांचे उपचार रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत अनेकदा आरोग्य प्रशासन आणि संबंधित अधिका-यांकडे तक्रारी करण्यात आल्या; मात्र या डॉक्टरांच्या दबावापुढे प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे.
बहुतांशी बोगस डॉक्टर आपल्या दवाखान्यावर कोणत्याही प्रकारचा फलक लावत नाहीत. तसेच घरोघरी जाऊन उपचार करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना अडथळे निर्माण होतात. तालुक्यातील गावांमध्ये अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या बोगस डॉक्टरांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या बोगस डॉक्टरांकडून रूग्णांची आर्थिक लूट होत असुन रुग्णांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. बोगस डॉक्टरांनी अशा दुर्गम खेड्यांची निवड करून आपले दुकान थाटले असल्याचे चित्र पनवेल परिसरात आहे. महाराष्ट्रात कोठेही अँलोपॅथीचा वैद्यकीय व्यवसाय करावयाचा झाल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमाणपत्र आवश्यक असते. आयुर्वेदिक आणि होमिओपथी या प्रकारच्या वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांना संबंधित कौन्सिलकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. परंतु अशा प्रकारचे कोणतेही प्रमाणपत्र नसताना अनेक खेड्यांमध्ये बोगस डॉक्टर्स आपला व्यवसाय करीत आहेत. यातील अनेक डॉक्टर्स असाध्य रोगावर खात्रीलायक इलाज करणारे आहेत. एखादा दवाखाना सुरू करताना कोणत्याही प्रकारची अधिकृत पदवी न घेताच नामफलकावर बीएचएमएस, एमबीबीएस आदी पदवी घेतली असल्याचे लिहिले जाते. ग्रामीण भागात एमबीबीएस किंवा यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेले डॉक्टर काम करण्यास राजी होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. हे डॉक्टर बोगस पदवी घेऊन दवाखाना थाटतात. मात्र यांना कोण प्रमाणपत्र उपलब्ध करून देते याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.
काही महिन्यांपूर्वी जनजागृती ग्राहक मंचाने, रायगड (शाखा पनवेल) यांनी डॉ. सुरेखा काथारा (सुकापूर), कमलाकर नावडेकर (मोरबे), अशोक घरत (मोरबे), ढाकळे (भोकरपाडा), चांदुरकर (वाजे), दिनेश मोरे (मोहो), पंकज सिंग (उसर्ली) हे बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय करत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यातील अशोक घरत हे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेचे माजी केंद्र प्रमुख असल्याचे समोर आले आहे. हे बोगस डॉक्टर गावागावात फिरून रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. घरोघरी जाऊन वैद्यकीय व्यवसाय करत आहे. बोगस डॉक्टरांमुळे याचा फटका प्रामाणिकपणे काम करणा-या डॉक्टरांना बसत असून त्यांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे. या संस्थेतर्फे पनवेल तालुक्यातील बोगस डॉक्टरांविरोधात ऑनलाइन व लेखी तक्रार करण्यात आली आहे. यातील साऱ्याच डॉक्टरांकडे मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र नसल्याचे जनजागृती ग्राहक मंचाचे म्हणणे आहे. बोगस डॉक्टरांचे प्रकार रोखण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. तरच असे प्रकार थांबतील.
अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करायला हवी. बोगस डॉक्टर शोधून सापडत नाहीत असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर मग अशा डॉक्टरांची नावे कळवून देखील अधिकाऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत घेऊन जायचे काय ?
-काशिनाथ जाधव – अध्यक्ष, जनजागृती ग्राहक मंच, रायगड (शाखा पनवेल)
अशा बोगस डॉक्टरांवर आम्ही कारवाई करणार आहोत. समितीची टिप्पणी आयुक्तांच्या सहीसाठी ठेवण्यात आलेली आहे. –
बसवराज लोहारे (वैद्यकीय अधीक्षक )
महापालिकेकडे मनुष्य संख्या कमी आहे तरी देखील अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार आहोत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाईची मोहीम सुरु करणार आहोत.
– सुधाकर शिंदे, आयुक्त पनवेल महापालिका
तळोजा हद्दीतील भाग महापालिका क्षेत्रात येत असल्याने महापालिकेने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. तर जनजागृती ग्राहक मंचाने केलेल्या तक्रारीनुसार डॉक्टरांची पाहणी केली असता त्यातील काही दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. -राजेंद्र इटकरे (आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पनवेल )
नवी मुंबई लाईव्ह.कॉम
८०८२०९७७७५