सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश स्कूल मधील धक्कादायक प्रकार
मुख्याध्यापिका सुविधा बेडदेवर गुन्हा दाखल
पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश स्कूलमध्ये एका ११ वर्षीय विद्यार्थिनीला लोखंडी कालथीच्या सहाय्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या विद्यार्थिनीचे पालक तिला भेटण्यासाठी पेणहून पनवेल- सुकापूर येथील शाळेत आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा बेडदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकापूर येथील जय मल्हार इंग्लिश स्कूलमधील शिक्षिकेचे १०० रुपये चोरीला गेल्यावरून शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी १८ जानेवारी रोजी इयत्ता ४ थीच्या वर्गात शिकणारी हर्षदा गंगाराम लेंडी (वय ११) हिच्यावर चोरीचा आरोप करत शरीरावर लोखंडी कालथीच्या सहाय्याने चटके दिले. या शाळेत ३२ निवासी विद्यार्थी तर इतर ५५ विद्यार्थी शिकत आहेत. मात्र १०० रुपये चोरल्याची कबूली न दिल्याचा राग मनात ठेऊन सुविधा बेडदे यांनी हर्षदाच्या पाठीवर निर्घृणपणे चटके दिले आहेत. चटके दिल्यानंतर देखील विद्यार्थी शांत राहिले होते. मात्र दर महिन्याच्या ३०, ३१ तारखेला मुलांचे आई वडील मुलांना भेटण्यासाठी खाऊ घेऊन शाळेत येतात. तसे हर्षदाचे वडील देखील तिला भेटण्यासाठी शाळेत आले असताना तिच्या पाठीवर चटके दिले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तिला विचारले असता निरागस हर्षदाने आपल्या वडिलांना या घटनेची माहिती दिली असता त्यांनी कमलाकर हिलम व इतराना सोबत घेऊन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय गाठले. व शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर याच शाळेतील इतर ७ विद्यारत्याना देखी ल शिक्षिकेने चटके दिले असल्याचे कमलाकर हिलम यांनी सांगितले. जयेंद्र मारुती पिंगळा, जितेश अंबाजी पिंगळा, संतोष गौऱ्या भस्मा,करुणा नांग्या पिंगळा,जान्हवी रामा भस्मा, नरेश लहू उघडा, ओमकार नामदेव शिद अशी अ न्य ७ जणांची नावे आहेत. १ फेब्रुवारी रोजी पालकानी खांदेश्वर पोलीस ठाणे गाठले व मुख्याध्यापिका सुविधा बेदडे हिच्याविरोधात कलम ३२४, ५०६ व बाल न्याय अधिनियम मुलांचे काळजी व रक्षण कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत. पालकांनी या शिक्षिके विरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
चौकट
एकीकडे शासन आदिवासी मुलासाठी विविध योजना राबवीत आहे तर दुसरीकडे आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र असह्यतेचे जीवन येत असल्याचे समोर येत आहे. शिक्षण मिळावे यासाठी आई वडील मुलांना शळेत पाठवत आहेत. मात्र येथे देखील मुले सुरक्षित नसल्याचे सुकापूर येथील घटनेवरून दिसून येत आहे.